ठळक बातम्या

लग्नात झालेला वाद आठवला; तीन वर्षांनी पतीने पत्नीचा दात तोडला

 

पुणे – पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका तरुणाने तीन वर्षांपूर्वी लग्नात फोटोग्राफर्समध्ये झालेल्या भांडणाचा राग आपल्या पत्नीवर काढल्याची घटना घडली. आरोपी पतीने पत्नीला बेदम मारहाण करत तिच्या तोंडावर ठोसा मारत तिचा दातच पाडला. या मारहाणीत पीडित पत्नीचा जबडादेखील फ्रॅक्चर झाला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

कौस्तुभ दीपक खरबस, असे अटक झालेल्या आरोपीचे नाव असून, तो पुण्यातील गुरुवार पेठेतील सीटी अपार्टमेंटमधील रहिवाशी आहे. तर आकांक्षा कौस्तुभ खरबस असे २७ वर्षीय फिर्यादी विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती कौस्तुभ आणि फिर्यादी आकांक्षा यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या लग्नात वधू आणि वराकडील मंडळींनी दोघांनी आपापले फोटोग्राफर्स बोलावले होते. यावेळी लग्नात फोटो काढण्यावरून संबंधित फोटोग्राफर्समध्ये वाद झाला होता. यावेळी फिर्यादी आकांक्षाच्या भावाने मध्यस्थी करत हा वाद मिटवला होता, पण सहा महिन्यांपूर्वी संबंधित दोन्ही छायाचित्रकार पुन्हा एकदा एका वेगळ्याच लग्नात आमने-सामने आले. दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. याची माहिती कौस्तुभला मिळाली. त्यामुळे त्याने आपल्या जुना वाद पुन्हा उकरून काढला. त्यानंतर आरोपी पतीने आकांक्षाला बेदम मारहाण केली आहे. घटनेच्या दिवशी १७ डिसेंबर रोजी आरोपी पती कौस्तुभने पाण्याने भरलेली बाटली पत्नीला फेकून मारली. त्यानंतर आरोपीने भिंतीची प्लास्टर लेव्हल करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉटम पट्टीने आणि हाताने पीडितेला मारहाण केली. यावेळी त्याने एक ठोसा पत्नीच्या तोंडावर देखील मारला. यामुळे पत्नीची दाढ पडली आहे. तसेच तिचा जबडा फ्रॅक्चर झाला आहे. यानंतर पीडित महिलेने खडक पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी पतीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …