लखीमपूर खेरी हिंसाचार : गृह राज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – राऊत

विरोधकांचा संसदेबाहेर लाँगमार्च
नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमधील लखमीपूर खेरी हिंसाचार प्रकरणावरून मंगळवारी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. या घटनेचा निषेध म्हणून सर्व विरोधी पक्षांनी संसदेबाहेर लाँगमार्च काढला. तर, लखमीपूर खेरी हिंसाचाराची लढाई संपलेली नाही, ही लढाई सुरूच राहील. याप्रकरणी गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराच शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला.
लखमीपूर खेरी हिंसाचारप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांनी संसदेबाहेर लाँग मार्च काढला. त्यानंतर विरोधक मीडियाला सामोरे गेले. यावेळी विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट भाजपवर हल्ला चढवला. संसदेचे हिवाळी अधिवेशन बुधवारी (२२ डिसेंबर) संपणार आहे. लखीमपूर खेरीची लढाई अजून संपली नाही. ही लढाई सुरूच राहील. एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले. हे कृ त्य सर्व जगाने पाहिले आहे, पण पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी ही घटना पाहिली नाही. याप्रकरणी एसआयटी (विशेष तपास पथक)चा अहवाल आला. तुम्ही एसआयटी स्थापन केली. तुमचीच एसआयटी आहे, तरीही तुम्ही एसआयटीचा अहवाल मानत नाही, त्यामागचे कारण काय?, असा सवाल राऊत यांनी केला.
देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येऊन आम्हाला सवाल करतात, पण तुमच्याच राज्यात तुमच्या नाकाखाली खून, हत्या होत आहेत. त्यावर तुम्ही कारवाई करीत नाही. त्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही दुर्लक्ष केले, तरी विरोधक म्हणून आम्ही तुम्हाला वारंवार सवाल विचारत राहू. आमच्या कितीही खासदारांना निलंबित करा. आज १२ खासदारांना निलंबित केले. पुढच्यावेळी ५० काय आमच्या सर्वांना निलंबित करा, पण आम्ही गप्प बसणार नाही. सवाल करीतच राहू. राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे आभार मानले. राहुल आणि प्रियंका गांधी हे त्या रात्री लखीमपूर खेरीला आले नसते, त्यांनी हा मुद्दा लावून धरला नसता, तर हे प्रकरण त्याच रात्री रफादफा केले गेले असते. राहुल आणि प्रियंका यांच्यामुळेच हे प्रकरण जगासमोर आले. त्यामुळे आम्ही त्यांचे आभारच मानतो, असेही त्यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …