लखनौ-अहमदाबाद संघांची धुरा येणार ‘या’ खेळाडूंकडे

नवी दिल्ली – पुढील वर्षीच्या म्हणजेच २०२२ च्या आयपीएल हंगामामध्ये लखनौ आणि अहमदाबाद या दोन नवीन टीमची एन्ट्री झाली आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामात ८ च्या ऐवजी १० संघ खेळणार आहेत. या हंगामासाठी लखनौ आणि अहमदाबाद या दोन्ही संघांसाठी नवीन तीन तीन खेळाडू खरेदी करण्याची संधी आहे. कारण, जुन्या सर्व संघांतील तीन तीन खेळाडू बदलण्यात येणार आहेत. मात्र, नव्याने खेळणाऱ्या या दोन संघांना ही संधी नव्हती, त्यामुळे त्यांना नवीन तीन तीन खेळाडू खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. आता लखनौ आणि अहमदाबाद हे दोन्ही संघ कोणकोणते नवीन खेळाडू खरेदी करणार याकडे सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
लखनौच्या टीममध्ये केएल राहुल, राशिद खान, इशान किशन हे खेळाडू येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या तीनही खेळाडूंची नावे आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. संजीव गोएंका यांनी ७ हजार कोटी रुपयांना लखनौची टीम खरेदी केली आहे. झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवरची लखनौ फ्रँचायझी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फ्लॉवर हे गेल्या दोन हंगामांत पंजाब संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते, तर गौतम गंभीर हा मेंटॉर अर्थात मार्गदर्शक म्हणून संघासोबत जोडला गेला आहे.
केएल राहुल हा लखनौ टीममध्ये सामील होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. लखनौने केएल राहुलसमोर २० कोटींची ऑफर ठेवल्याची माहितीही समोर आली आहे. केएल राहुल हा कर्णधार म्हणून संघात सामील होऊ शकतो. तर सनरायझर्स हैदराबादचा राशिद खान लखनौची दुसरी पसंती ठरू शकतो. हैदराबादने त्याला कायम ठेवलेले नाही. त्यामुळे राशिद हा लखनौ संघाकडून खेळण्याची दाट शक्यता आहे. राशिद खान हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. तर इशान किशनने गेल्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी दमदार खेळ दाखवला होता, तरीही त्याला मुंबईने त्याला कायम केलेले नाही. त्यामुळे तो लखनौच्या संघात सामील होण्याची शक्यता आहे.
सीव्हीसी कॅ पिटलने आयपीएलची अहमदाबाद फ्रँ चायझी ५ हजार कोटींहून अधिक रुपयांना विकत घेतली आहे. अहमदाबाद मेगा लिलावापूर्वी ज्या तीन खेळाडूंना खरेदी करण्याचा विचार करीत आहे, त्यामध्ये श्रेयस अय्यरचे नाव आघाडीवर आहे, तसेच डेव्हिड वॉर्नर आणि हार्दिक पंड्या यांच्या नावाचाही समावेश आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅ पिटल्सने ७ वर्षांनंतर प्रथमच प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. मात्र, यावेळी अहमदाबाद श्रेयसला कर्णधार म्हणून आपल्या संघात घेऊ शकतो. आयपीएलच्या शेवटच्या हंगामात सपशेल अपयशी ठरलेला डेव्हिड वॉर्नर अहमदाबाद फ्रँ चायझीमध्ये सामील झाल्याचीही जोरदार चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकात तो मालिकावीर ठरला होता. ॲशेस मालिकेतही त्याने चांगली कामगिरी केली आहे. हार्दिक पंड्या सध्या फॉर्ममध्ये नाही. मुंबईने त्याला कायम ठेवलेले नाही. त्यामुळे तो पुढील आयपीएलमध्ये अहमदाबादकडून खेळताना दिसू शकतो.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …