मुंबई – भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत व्यस्त आहे. या कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाला त्यांच्याविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळायची आहे. या मालिकेसाठी सोमवारपर्यंत टीम इंडियाची घोषणा होणार होती, पण आता ती ३-४ दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा निर्णय एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मामुळे घेण्यात आला आहे. शर्मा अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही आणि तो या मालिकेत खेळू शकेल की नाही, याबद्दल सध्या काही सांगता येणार नाही. यामुळेच बीसीसीआयने निवड समितीची बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने ग्रस्त असून, तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे. तो तंदुरुस्त दिसत असला, तरी हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बीसीसीआय त्याच्या दुखापतीबद्दल पूर्ण खात्री बाळगत आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेत खेळणार की नाही, हे ३० किंवा ३१ डिसेंबरला ठरेल. रोहित शर्मा एकदिवसीय मालिकेसाठी अयोग्य आढळल्यास के. एल. राहुल संघाची कमान सांभाळू शकतो.
अश्विन, ऋतुराज आणि व्यंकटेशला मिळू शकते संधी
एकदिवसीय संघात आर. अश्विनला संधी मिळू शकते. तो शेवटचा एकदिवसीय सामना २०१७ मध्ये खेळला होता. अलीकडेच त्याने टी-२० क्रिकेटमध्येही पुनरागमन केले आहे. अश्विनशिवाय ऋतुराज गायकवाड आणि व्यंकटेश अय्यर या युवा खेळाडूंनाही वनडे संघात संधी मिळू शकते. विजय हजारे ट्रॉफीमध्ये या दोन्ही खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली आहे, त्यामुळे या दोघांना एकदिवसीय संघात स्थान मिळेल, असे बोलले जात आहे.