- वाचकांची होतेय गैरसोय
मुंबई – लोकल म्हणजे मुंबईची लाइफलाइन. कामानिमित्ताने दररोज लाखो प्रवासी रेल्वे प्रवास करतात. लांबच्या प्रवासात विरंगुळा म्हणून प्रवाशी प्लॅटफॉर्मवरील ए. एच. व्हिलर बुक स्टॉलवरून वृत्तपत्र आणि मासिकांची खरेदी करतात. गेली अनेक वर्षे वाचकांच्या हक्काचे ठिकाण असलेल्या या बुक स्टॉलला, मात्र आता आपल्या मूळ उद्देशाचा विसर पडला आहे. ए. एच. व्हिलर बुक स्टॉलचे बहुद्देशीय स्टॉलमध्ये रूपांतर झाल्याने येथील वृत्तपत्र आणि मासिकांची जागा आता हळूहळू खाद्यपदार्थांनी घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे वाचकांची गैरसोय होत असून, पूर्वीप्रमाणे स्वतंत्र बुक स्टॉल असावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
देशात सर्वप्रथम अलाहाबादमध्ये १८७७ साली ए. एच. व्हीलर स्टॉल उभारण्यात आले होते. देशभरातील २५८ स्थानकांवर कंपनीचे ३७८ बुक स्टॉल, १२१ काऊंटर टेबल आणि ३९७ ट्रॉली आहेत. मात्र, रेल्वे स्थानकांवर वाचनाचा वारसा टिकवून ठेवणाऱ्या ए. एच. व्हिलरचे बुक स्टॉल आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वे मार्गावरील ए. एच. व्हीलर बुक स्टॉलचे रुपांतर बहुउद्देशीय स्टॉलमध्ये झाले आहे. त्यामुळे येथे पूर्वीप्रमाणे वृत्तपत्रे आणि मासिके वाचकांना उपलब्ध होत नाहीत. पाकीटबंद खाद्यपदार्थ, थंडपेय, पेन, ब्रश, पाणी अशा वस्तू अधिक प्रमाणात दिसत आहेत. वृत्तपत्र आणि मासिकांच्या विक्रीमुळे प्लॅटफॉर्मवर सुरक्षा आणि स्वच्छता व्यवस्थेला बाधा पोहोचत नाही. वाचक स्टॉलवरून वृत्तपत्र घेऊन लगेच निघून जातात, त्यामुळे तिथे गर्दी देखील होत नाही. आता बहुद्देशीय स्टॉल झाल्यामुळे गर्दी वाढू लागली आहे. बहुद्देशीय स्टॉल करण्याच्या नादात तिथे आता पूर्वीसारखे पेपर, मासिके मिळत नाहीत. वाचकांच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आणि वृत्तपत्रांच्या कार्यालयात येत आहेत. त्यामुळे वर्तमानपत्र आणि मासिकांसाठी पूर्वीप्रमाणे स्वतंत्र स्टॉल असावेत, अशी मागणी युनाईटेड फोरम ऑफ न्यूज पेपर्स, मुंबईने केली आहे.