ठळक बातम्या

रेल्वेचा प्रवास आणि प्रवाशांचे लसीकरण

१५ आॅगस्ट, २०२१ पासून कोरोना लसींचे दोन डोस घेतलेल्यांनाच मुंबईतील लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा देणारा राज्य सरकारचा निर्णय मनमानी आणि भेदभाव करणारा असल्याचा दावा करत नव्यानं एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
लसीकरण करणं हे ऐच्छिक आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय हा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणारा असल्याचा दावाही याचिकेतून केला गेला आहे. इंडियन काऊन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक तत्वांनुसार लस अनिवार्य नसून, ऐच्छिक असल्याचे स्पष्ट केले आहे.

तसं असतानाही सरकारचा हा निर्णय मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात आहे. लसीकरण केलेल्या आणि लसीकरण न केलेल्या व्यक्तींमध्ये कोणताही फरक नसावा, कारण दोघेही कोरोना विषाणूचे प्रसारक असू शकतात आणि ते रोग पसरवू शकतात. जी व्यक्ती कोरोनातून पूर्णपणे बरी झाली आहे, ती व्यक्ती लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीपेक्षा कोरोना विषाणू पसरण्याची शक्यता कमी असल्याचेही याचिकेत म्हटलेलं आहे.
या याचिकेवर निर्णय देताना असे सांगितले आहे की, लोकल ट्रेनमधून प्रवास करणे हा मूलभूत अधिकार असू शकतो; मात्र काही निर्बंध हे परिस्थितीनुसार घातलेले आहेत, तसेच काही निर्णय हे त्या क्षेत्रातील जाणकार व अभ्यासू व्यक्तींवर सोपवायला पाहिजे. बाहेरील देशातील परिस्थिती व लोकसंख्या आपल्यासारखी नाही. याचीही जाणीव याचिकाकर्त्यांना करून दिली, तसेच लसीकरणाचा काहीही फायदा नाही हे तुम्ही शास्त्रीय अभ्यासाचा दाखला देऊन पटवून देण्याचे निर्देश दिले.

गेल्या दीड वर्षभरामध्ये लोकलबंदीमुळे नोकरी नसल्याने अनेकांनी कर्ज काढून आपला उदरनिर्वाह सुरू ठेवला आहे. मुंबईची लोकल ही जीवनवाहिनी आहे. दर चार ते पाच मिनिटांनंतर स्टेशनवर आलेली लोकल ही फक्त प्रवाशी आणत नाही, तर त्या स्टेशनवर आर्थिक विकास आणते. यातून अनेक लोकांचे संसार चालतात.
सरकारी आणि खासगी आस्थापनांची कार्यालयेही पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली जात असताना, सामान्यांच्या प्रवासाचा एकमेव मार्ग बंद आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आपत्ती आणि पुनर्वसन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही.

मुख्यमंत्री कार्यालयाकडे पत्रव्यवहार करूनही लक्ष दिले जात नसल्याने प्रवासी हतबल आहेत. दोन्ही लस घेऊनही तुम्हाला लोकल ट्रेनचे तिकीट मिळणार नाही, फक्त पास मिळेल. पास काढल्यानंतरही रोजच्या रोज मुंबई महानगरपालिकेकडून प्रमाणित केलेले लसीकरणाचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा तिकीट तपासनीस तुम्हाला पास असूनही दंड करू शकतात. यासारख्या अटीमुळे समस्त मुंबईकर त्रस्त आहेत.
– बाळासाहेब हांडे/९५९४४४५२२२\\

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …