पुणे – गेल्या काही वर्षांपासून पुण्यात मुख्यालय असलेली रूपी बँक मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या या बँकेचे राज्य बँकेत विलिनीकरण करण्याचा देखील प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने फेटाळून लावला आहे. या पार्श्वभूमीवर तब्बल १०७ वर्ष जुन्या रूपी बँकेचे ठेवीदार आणि खातेदार प्रचंड चिंतेत सापडले होते. या ठेवीदारांना आपल्या ठेवींची चिंता सतावू लागली होती, मात्र या सर्व ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सहकार क्षेत्रातीलच मोठे नाव असलेल्या सारस्वत को-आॅपरेटिव्ह बँकेने रूपी बँक ताब्यात घेण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भातला प्रस्ताव सारस्वत बँक प्रशासनाने रूपी बँक आणि त्यासोबतच रिझर्व्ह बँकेला देखील पाठवला आहे.
इंडियन को-आॅपरेटिव्हने दिलेल्या वृत्तानुसार, सारस्वत बँकेचे संचालक गौतम ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. रूपी बँकेचे काही ठेवीदार आम्हाला सातत्याने बँक ताब्यात घेण्यासंदर्भात विनंती करत होते. आर्थिक संकटाचे प्रकरण आणि इतर गोष्टींचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर आम्ही ही बँक ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे गौतम ठाकूर म्हणाले. सारस्वत बँकेने पाठवलेल्या प्रस्तावानुसार, रूपी बँकेच्या सर्व ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवल्या जातील. विशेषत: ज्या ठेवीदारांच्या ठेवी ५ लाखांपेक्षा जास्त आहेत, त्यांना सुमारे ६ टक्क्यांपर्यंतचा परतावादेखील दिला जाणार असल्याचे सारस्वत बँकेचे संचालक गौतम ठाकूर यांनी जाहीर केले आहे. याशिवाय, बँकेचा परवाना हा प्रामुख्याने पुणे आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या इतर भागात वापरला जाईल, हे देखील ठाकूर यांनी सांगितले. हा परवाना महाराष्ट्राच्या बाहेर वापरला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात होती.
यावेळी इंडियन को-आॅपरेटिव्हसोबत बोलताना गौतम ठाकूर म्हणाले, रूपी बँक लोकमान्य टिळकांनी स्थापन केली होती. या बँकेला फार मोठा इतिहास आहे. सारस्वत बँकेपेक्षाही रूपी बँक जुनी आहे. एकेकाळी ती सारस्वत बँकेपेक्षाही मोठी होती, असे ठाकूर म्हणाले. सारस्वत बँकेने याआधी देखील आतापर्यंत अशा ८ बँका ताब्यात घेतल्या आहेत. त्यातून गेल्या १० ते १५ वर्षांत जवळपास १० लाख ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण बँकेने केले आहे. आम्ही हे केले याचा आम्हाला अभिमान आहे, असेदेखील ठाकूर यांनी नमूद केले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …