राहुल गांधींचा मुंबईतील मेळावा पुढे ढकलला

मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी यांचा शिवाजी पार्कवर एक मेळावा आयोजित करण्यात येणार होता. या मेळाव्याच्या परवानगीसाठी प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रेसने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र मंगळवारी सकाळी न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वीच मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी बिनशर्त याचिका मागे घेतली आणि दुपारी पत्रकार परिषद घेत राज्यावर ओमिक्रॉनचे संकट असल्याने हा मेळावा पुढे ढकलण्यात येत असल्याचे सांगितले.
काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर २८ डिसेंबर रोजी हा मेळावा होणार होता. या दिवशी शिवाजी पार्क येथे सभा घेता यावी, म्हणून मुंबई महापालिकेला पत्र पाठवले, मात्र महापालिकेने नगरविकास विभागाकडे जाण्यास सांगितले. नंतर प्रशासनाकडून कोणताही प्रतिसान न मिळाल्याने काँग्रेसने राहुल गांधींच्या सभेसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आम्ही १५ दिवसांपासून राज्य सरकारकडे मागणी करत होतो, पण आम्हाला उत्तर आले नाही. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात गेलो होतो, मात्र ओमिक्रॉनचे संकट लक्षात घेऊन मेळावा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. हा मेळावा रद्द झाल्याचे आम्ही राहुल गांधी यांच्या कार्यालयात कळवले आहे, पण नवी तारीख जाहीर झाल्यावर शिवाजी पार्कातच राहुल गांधी यांचा मेळावा होईल, असे भाई जगताप यांनी स्पष्ट केले, तसेच काँग्रेसच्या स्थापना दिनाचा कार्यक्रम तेजपाल ऑडिटोरियममध्ये घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …