राष्ट्रीय खो-खो स्पर्धा – महाराष्ट्राचा गोव्यावर दणदणीत विजय

उना – ३१ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे आयोजन २७ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर २०२१ या कालावधीत इंदिरा स्टेडियम, नांगल रोड, उना, हिमाचल प्रदेश येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत रविवारी महाराष्ट्राच्या किशोर संघाने गोव्यावर दणदणीत विजय मिळवत शानदार विजयी सलामी दिली. रविवारी सकाळच्या सत्रात पार पडलेल्या या सामन्यात महाराष्ट्राच्या किशोर संघाने गोव्यावर दणदणीत विजय मिळवताना ३१-०६ असा एक डाव २५ गुणांनी धुव्वा उडवला. महाराष्ट्र संघाचा रविवारी एकही गडी प्रत्यक्ष बाद करण्यात गोव्याच्या खेळाडूंना यश आले नाही. महाराष्ट्राचे प्रशिक्षक प्रफुल्ल हाटवटे यांनी आपल्या खेळाडूंची दमछाक न होऊ देता सर्व संरक्षकांना ठराविक अंतराने निवृत्त व्हायला लावले. त्यामुळे गोव्याला दोन्ही डावात जे ६ गुण मिळाले आहेत ते निवृत्त झालेल्या संरक्षकांचे आहेत. महाराष्ट्राच्या पहिल्या डावात राज जाधव (३:४० मि. संरक्षण व १ गडी) व अथर्व पाटील (नाबाद २:०० मि. संरक्षण १ गडी) तर दुसऱ्या डावात ईशांत वाघ (३:३० मि. संरक्षण व ४ गडी), मोहन चव्हाण (१:५० मि. संरक्षण व ३ गडी) यांनी निवृत्त होत गुण बहाल केले. महाराष्ट्राने आक्रमणात हाराद्या वसावेने ६ गडी तर कर्णधार सोत्या वळवी व जिशान मुलाणीने प्रत्यकी ५-५ गडी बाद करत मोठा विजय साजरा केला, तर गोव्याच्या देवांश व रजतने थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला. किशोरांच्या दुसऱ्या सामन्यात कोल्हापूरने हिमाचल प्रदेशचा २१-०५ असा एक डाव १६ गुणांनी पराभव केला. कोल्हापूरच्या योगेशने ५:०० मि. संरक्षण केले, उदयने ३:२० मि. संरक्षण केले तर श्रवणने नाबाद २:०० मि. संरक्षण करत विजयात मोलाचा वाटा उचलला. कर्नाटकच्या किशोरांनी बिहारचा २९-०४ असा एक डाव २५ गुणांनी पराभव केला. या सामन्यात कर्नाटकच्या प्रीथमने ६:०० मि. प्रकाशने ३:१० मि. व गुरुराजने ३:०० मि. संरक्षण केले. तसेच किशोरींच्या सामन्यांमध्ये तेलंगणाने मध्य भारतचा १३-२ असा एक डाव ११ गुणांनी पराभव केला, उत्तर प्रदेशने हिमाचल प्रदेशचा १०-४ असा एक डाव ६ गुणांनी पराभव केला तर विदर्भाने उत्तराखंडवर १७-१२ असा ५ गुणांनी पराभव केला, तर कोल्हापूरने त्रिपुरावर २६-० असा एक डाव २६ गुणांनी दणदणीत विजय साजरा केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …