नवी मुंबई – नवी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासून कंबर कसली आहे. दरम्यान, ऐरोली येथे घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मार्गदर्शन केले, मात्र यावेळी त्यांनी शिवसेना आणि अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. मोठा भाऊ म्हणून आदर करू, मात्र बोलायचे एक आणि करायचे एक हे खपवून घेतले जाणार नाही, असे आव्हाड म्हणाले होते. मौका सभी को मिलता हैं. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर जायचे याचे पर्याय खुले आहेत, असा इशाराही आव्हाड यांनी सेनेला दिला होता.
महाविकास आघाडीचे सरकार सुरळीत सुरू असले, तरी स्थानिक पातळीवर सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत आव्हाड यांनी दिले आहेत. निवडणुका जवळ आल्या की, सत्ताधारी शिवसेना वॉर्ड रचनेत मनमानी करते. आपल्याला निवडणूक जिंकता यावी, यासाठी शिवसेना मनपा अधिकारी, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्याला सोईस्कर होईल, अशा पद्धतीने वार्ड रचना करून घेते. हा अनुभव आम्हाला ठाण्यात आला होता. जर अशी मनमानी कृत्य करून वार्ड रचना पाडली जात असेल, तर ही लोकशाहीला घातक असून, याकडे निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी आव्हाड यांनी केली. ते पुढे म्हणाले, आम्ही आघाडी धर्म पाळून विरोधी पक्षात असलेल्या भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर टीका करायची, मात्र तुम्ही पडद्यामागून संबंध ठेवायचे. मग आम्ही शत्रुत्व का घ्यायचे?, राजकारणातील गणिते कधीही बदलू शकतात. मौका सभी को मिलता हैं. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर जायचे याचे पर्याय खुले आहेत, असा इशारा आव्हाडांनी शिवसेनेला दिला. दुसरीकडे, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. एकीकडे आघाडी करून महानगरपालिका लढणार असल्याचे संकेत दिले जात असताना दुसरीकडे शिवसेनेवर जाहीर टीका केली जात असेल, तर आघाडीत बिघाडी होईल, असा प्रतिइशारा शिवसेनेकडून देण्यात आला.