* खा.छत्रपती संभाजीराजेंनी दिले भेटीचे आमंत्रण
मुंबई – भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद लवकरच रायगडाला भेट देणार आहेत. यासंदर्भातील माहिती भाजपचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ट्विटरवरून दिली आहे. संभाजीराजेंनी गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ट्विटरवरून यासंदर्भातील ट्विट केले असून, राष्ट्रपतींचा हा दौरा कसा ठरला आणि तो कधी होणार आहे, यासंदर्भातील माहिती दिली.
संभाजीराजेंनी ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार त्यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे आमंत्रण दिले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय ७ डिसेंबर, २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत. राष्ट्रपती रायगडाला भेट देणार ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे, असंही त्यांनी म्हटले आहे़ यापूर्वी ५ जानेवारी, २०१४ रोजी त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी रायगडाला भेट दिली होती. सांगली येथील शिव प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महानगड ते रायगड या पायी मोहिमेचा समारोप रायगड किल्ल्यावर झाला होता. याच कार्यक्रमासाठी मोदी उपस्थित होते. शिवरायांना अभिवादन करून त्यांनी उपस्थित जनसभेला संबोधित केले होते़