राष्ट्रनिर्मितीत मोघलांचेही योगदान – नसिरुद्दीन शाह

नवी दिल्ली – छत्तीसगडमधील धर्म संसदेत काही कथित साधूंनी आक्रस्ताळेपणा करीत मुस्लिमांविरोधात घोषणा दिल्या. फक्त मुस्लीमच नाही, तर अकोल्याच्या कालीचरण महाराजांसारख्यांनी तर महात्मा गांधींनाही सोडले नाही. त्याच धर्मसंसदेत केलेल्या भाषणाचे आता पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. त्यातली सर्वात चर्चेतली प्रतिक्रिया आलीय ती ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांची. ‘द वायर’ यू ट्यूब चॅनेलसाठी प्रसिद्ध पत्रकार करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखतीत नसिरुद्दीन शाह यांनी लढण्या-भिडण्याची भाषा केली आहे.
धर्मसंसदेतल्या वादग्रस्त वक्तव्यावर थापर यांनी नसिरुद्दीन शाह यांना बोलते केले. त्यातल्या एका प्रश्नावर उत्तर देताना शाह म्हणाले की, मला आश्चर्य वाटतं की, या लोकांना ते काय बोलतायत हे तरी कळते की नाही?, ते जे काही बोलण्याचा प्रयत्न करीत आहेत, ते एक पूर्णांशाने नागरी युद्ध आहे. मुस्लिमांना भयभीत करण्याचे, घाबरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण आम्ही मुस्लीम २० कोटी (२०० दशलक्ष) आहोत. हा आकडा खूप साधा का वाटतो?, आम्ही २० कोटी लढू, आम्हा २० कोटी मुस्लिमांचा याच देशावर दावा आहे, आम्हा २० कोटींसाठी हीच मातृभूमी आहे. आम्ही इथेच जन्मलो. आमच्या कित्येक पिढ्या इथेच जन्मल्या आणि गेल्या. मला खात्री आहे की, जर कुणी असा मुस्लिमांविरोधात प्रयत्न केलाच, तर त्याचा प्रचंड विरोध केला जाईल. ती प्रतिक्रिया संतप्त असेल.
दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात नसिरुद्दीन शाह म्हणाले, मोघलांनी केलेले अत्याचार पुन:पुन्हा हायलाइट केले जातात, पण मोघलांचे राष्ट्रनिर्मितीतले योगदान विसरले जाते. मोघलांनीच ऐतिहासिक स्मारके निर्माण केली. गौरवशाली इतिहास त्यांनी दिला. संगीत, साहित्य, सांस्कृ तिक, नृत्य, गायन, चित्रकला यांच्या परंपरा मुस्लिमांनी निर्माण केल्या. तैमुरबद्दल कुणी बोलत नाही, नादीर शाहबद्दलही कुणी बोलत नाही, गझनीही नाही कारण ते इतिहासाशी सुसंगत नाहीत. ते आले आणि लुटून गेले, पण मोघल या देशात आले आणि त्यांनी ही भूमी त्यांची केली. त्यांना हवे तर तुम्ही निर्वासित म्हणू शकता आणि मुस्लीम शासकांनी केलेल्या अत्याचाराबाबत आज प्रत्येक मुसलमानाला जबाबदार धरणे हे हास्यास्पद आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …