रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरवू देणार नाही

  •  गडावरील हॅलिपॅडला शिवप्रेमींचा विरोध

रायगड – शिवछत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद ६ डिसेंबर रोजी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडावर येणार आहेत. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॉप्टर रायगड किल्ल्यावर उतरवले जाणार आहे, मात्र आता यावरून वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या दौऱ्याला आमचा विरोध नाही, पण किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हेलिकॉप्टर आम्ही उतरू देणार नाही, असा पवित्रा येथील शिवप्रेमींनी घेतला आहे.
पूर्वी किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिपॅड होते. या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरताना व उड्डाण घेताना मोठ्या प्रमाणात धूळ, माती, केर कचरा उडत असे. ही धूळ, माती होळीच्या माळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर उडत असल्याने १९९६ ला येथे उपोषण करून हा हॅलिपॅड येथून काढून टाकण्यात आला होता. सुमारे २५ वर्षांनंतर शिवरायांच्या अवमानाचा तोच प्रश्न पुन्हा निर्माण होत असल्याने शिवप्रेमींकडून विरोध केला जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे किल्ले रायगडावर भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहेत. दरम्यान, राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त ३ ते ७ डिसेंबर या कालावधीत किल्ले रायगडावर नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. किल्ले रायगड, रायगड रोप-वे, रायगड किल्ल्याच्या आजूबाजूकडील परिसर हे तसेच माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचाड रस्ता व नातेगाव ते पाचाड बाजूकडील रस्तासुद्धा सुरक्षिततेच्या कारणास्तव पर्यटकांकरिता बंद करण्यात आला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात राष्ट्रपती व पंतप्रधान अशा दोन्ही पदांवरील मान्यवरांनी भेट दिलेला रायगड हा एकमेव असा किल्ला आहे. याआधी १९८० साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३०० व्या पुण्यतिथी दिनी तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी दुर्गराज रायगडवर आल्या होत्या. १९८५ साली राजसदरेवर उभारण्यात आलेल्या मेघडंबरीचे अनावरण करण्यासाठी माननीय राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग रायगडावर आले होते. ३ एप्रिल १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी रायगड किल्ल्याला भेट दिली होती. यावेळी महाराजांची प्रतिमा असलेले २ रुपये किमतीचे नाणे भारत सरकारच्या वतीने काढण्यात आले होते. राष्ट्रपती कोविंद स्वत: शिवभक्त असून, २०१८ साली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने राजधानी दिल्ली येथे आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याच सोहळ्यात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी माननीय राष्ट्रपती महोदयांना छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट म्हणून दिले होते. त्यापूर्वी राष्ट्रपती भवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा नसल्याने सदरचे तैलचित्र राष्ट्रपती भवनामध्ये त्यांनी अत्यंत अभिमानाने लावलेले आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …