रायगडावर चादर पसरून प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न संभाजीराजेंनी हाणून पाडला

रायगड – स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर रंगरंगोटी करून चादर पसरवून धार्मिक प्रार्थनास्थळ उभे करण्याचा प्रयत्न संभाजीराजे छत्रपती यांनी हाणून पाडला आहे. रायगडावर प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींनी केल्याची माहिती शिवप्रेमींनी दिल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत पुरातत्व खात्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर पुरातत्व खात्याने त्वरित कारवाई करून ते ठिकाण पूर्ववत केले आहे, तसेच तिथे सुरक्षा रक्षकाची नियुक्तीही करण्यात आली आहे.
याबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, किल्ले रायगड येथील ‘मदार मोर्चा’ या ठिकाणी काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी रंगरंगोटी करून चादर घालून तिथे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केल्याचे अनेक शिवभक्तांनी आमच्याशी संपर्क साधून निदर्शनास आणून दिले. ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाच्या नियमांमध्ये या गोष्टी प्रतिबंधित असताना, किल्ले रायगडसारख्या ऐतिहासिक ठिकाणी अशा गोष्टी होणे अतिशय चुकीचे आहे. किल्ले रायगडचे पावित्र्य व ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहावे, यासाठी मदार मोर्चा याठिकाणी करण्यात आलेली रंगरंगोटी हटवून तिथे कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम अथवा रचना करण्यास तात्काळ पायबंद घालण्यात यावा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी पत्राच्या माध्यमातून केली होती, तसेच गुरुवारी सकाळी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या महासंचालिका विद्यावतीजी आणि मुंबई विभागाचे अधीक्षक पुरात्व शास्त्रज्ञ राजेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधला आणि तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचित केले. यास प्रतिसाद देत पुरातत्व विभागाने मदार मोर्चा येथील रंगरंगोटी हटवून ते ठिकाण पूर्ववत केलेले आहे, तसेच त्याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूकही केली आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …