रामदास कदम यांना विधानभवनात जाण्यापासून अडवले, नंतर सोडले

मुंबई – शिवसेनेच्या बड्या नेत्यांवरच थेट हल्लाबोल करणारे शिवसेना नेते आणि माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम शुक्रवारी विधानभवनात आले होते, मात्र त्यांना विधानभवनात जाण्यापासून रोखण्यात आले. आरटीपीसीआर चाचणी केली नसल्याने कदम यांना पोलिसांनी आत प्रवेश दिला नाही. त्यामुळे कदम प्रचंड वैतागले होते. त्यानंतर त्यांनी फोनाफोनी केल्यावर बऱ्याच वेळानंतर त्यांना आत सोडण्यात आले, मात्र कदम हे माजी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या पक्षाची राज्यात सत्ता आहे, असे असतानाही त्यांना प्रवेशद्वारावरच अडवले गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते, तसेच या घटनेचे राजकीय अर्थही काढले जात होते.
काही कामानिमित्ताने रामदास कदम शुक्रवारी दुपारी विधानभवनात आले होते, मात्र त्यांना प्रवेशद्वारावरच अडवण्यात आले. आरटीपीसीआर चाचणी केली का अशी विचारणा कदम यांना करण्यात आली. कदम यांनी नाही असे उत्तर दिल्याने त्यांना आतमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला. जोपर्यंत आरटीपीसीआर चाचणी करून येत नाही, तोपर्यंत आतमध्ये प्रवेश मिळणार नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. यावेळी कदम यांनी सुरक्षा रक्षकांसोबत वादही घातला, मात्र तरीही त्यांना आतमध्ये जाऊ दिले गेले नाही. त्यानंतर कदम हे बराच वेळ विधानभवनाबाहेर उभे होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. याचवेळी त्यांनी काही ठिकाणी फोनाफोनीही केली. त्यानंतर त्यांना आत सोडण्यात आले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …