ठळक बातम्या

रामकुंडावर छटपूजेला परवानगी नाही

नाशिक – नाशिकमधील रामकुंडावर बुधवारी होणाऱ्या छटपूजेला पोलिसांनी परवानगी नाकारली असून, कोरोना प्रसार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर भारतीयांमध्ये छटपूजेला मोठे महत्त्व असते. नाशिकमध्ये हजारो उत्तर भारतीय असून, ते दरवर्षी मोठ्या उत्साहात रामकुंडावर छटपूजा साजरी करतात, मात्र गेल्या दोन वर्षांपासून नाशिककरांना कोरोनाने हैराण केले आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने नागरिकांचे प्रचंड हाल केले. अनेकांना मृत्यूने गाठले. अजूनही नाशिक जिल्ह्यातल्या काही तालुक्यांत विशेषत: सिन्नर, निफाड, येवल्यामध्ये रुग्ण वाढत आहेत. ते पाहता पोलिसांनी बुधवारी रामकुंडावर होणाऱ्या छटपूजेला परवानगी नाकारली आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यंदा छटपूजा ही घरीच करावी, असे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोना शून्यावर आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत १०० टक्के कोरोना लसीकरण करावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यात विक्रमी लसीकरण करणाऱ्या नाशिक विभागात येत्या काळात या मोहिमेची गती अजून वाढणार आहे. त्याची सुरुवात मंगळवारपासून करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात एकही डोस न घेतलेले किती जण आहेत, दुसरा डोस किती जणांचा राहिला आहे, याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …