मुंबई – राज्य शासनात विलिनीकरण करा, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभरात बेमुदत आंदोलन सुरू आहे. या बेमुदत संपावर कोणताही तोडगा निघाला नसताना आता बेस्टच्या संघटनांनीही विलिनीकरणाची मागणी लावून धरली आहे. बेस्टचे महापालिकेत विलिनीकरण करा, अशी मागणी बेस्ट कृती समितीकडून करण्यात आली आहे. दरम्यान, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीवरून सुरू असलेला संप अद्याप मिटलेला नाही, त्यात आता राज्य सरकारपुढे बेस्टचे नवे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.
बेस्टची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलिन करा, अशी मागणी बेस्ट कामगारांनी लावून धरली होती. २०१७ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्यावेळी बेस्ट अर्थसंकल्प पालिका अर्थसंकल्पात विलिनीकरण करणार, असे शिवसेनेने वचननाम्यात जाहीर केले होते. पालिका सभागृहात हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला असून, राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे पडून आहे. चार वर्षे होत आली, तरी शिवसेनेकडून वचनाची पूर्तता करण्यात आलेली नाही. मुंबई महापालिका, बेस्ट व आता राज्यातही शिवसेनेची सत्ता असून, मुख्यमंत्रीही शिवसेनेचा आहे. त्यामुळे बेस्ट कामगारांना मोठी आशा निर्माण झाली आहे. परंतु राज्यात सत्ता स्थापन होऊन दोन वर्ष पूर्ण व्हायला आली, मात्र विलिनीकरणाच्या वचनपूर्तीसाठी अद्याप हालचाली दिसत नाही. बेस्ट अर्थसंकल्प पालिका अर्थसंकल्पात विलिनीकरणाचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला आहे. या विभागाचे मंत्रीही शिवसेनेचे आहेत. त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या बेस्टला अर्थसंकल्प विलिनीकरणामुळे मोठा आधार मिळणार असल्याने बेस्ट कर्मचारीही विलिनीकरणाच्या प्रस्तावाकडे डोळे लावून बसले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात बेस्टच्या विलिनीकरणाच्या मुद्याकडे दुर्लक्ष केल्याने बेस्ट कामगारांमध्ये नाराजी आहे.
सध्या तोडगा निघत नसल्याने एसटी कामगारांचा संप चिघळला आहे. मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबनदेखील करण्यात आले आहे. सध्या एसटी वाहतूक बंद असल्याने एसटी प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत. मुंबईसह काही भागांत एसटी मार्गासाठी पर्यायी वाहतूक म्हणून बेस्ट बसला प्रशासनाकडून एसटी मार्गावर रस्त्यावर उतरवण्यात आले होते, मात्र बेस्टचे महापालिकेत विलिनीकरण करा, ही मागणी आता जोर धरते आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …