ठळक बातम्या

राज्यात २४ तासांत ओमिक्रॉनचे १९८ नवे रुग्ण

मुंबई – ओमिक्रॉन व्हेरिएंटने राज्याची चिंता वाढवली आहे. दररोज ओमिक्रॉनबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. राज्यातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या ४५० वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात १९८ नवीन ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तब्बल १९० रुग्ण हे मुंबईतील आहेत, तर चार रुग्ण ठाण्यातील आहेत. सातारा, नांदेड, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. बुधवारी राज्यात ८५ नवीन ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले होते. गुरुवारी यामध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या ४५० इतकी झाली आहे. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील एकूण ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या ३२७ इतकी झाली आहे. म्हणजेच ६० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, राज्यातील ४५० रुग्णांपैकी १२५ रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे. राज्यात आढळलेल्या ओमिक्रॉन रुग्णांमध्ये २६ रुग्ण इतर राज्यांतील आहेत, जे विदेशातून महाराष्ट्रात आले होते. ९ रुग्ण हे विदेशी नागरिक आहेत.
राज्याच्या प्रशासनाचे मुख्य केंद्र असलेल्या मंत्रालयात ड्युटी करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एका लिपिकालाही ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर २० डिसेंबरपासून उपचार सुरू असून, इतर दोघांना बुधवारी (२९ डिसेंबर) उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली. महाराष्ट्रातील पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण कल्याणमध्ये सापडला होता. हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून आला होता, तर नायझेरियातून आलेल्या दुसऱ्या रुग्णालादेखील ओमिक्रॉन झाल्याचे निदान झाले होते, मात्र या दोन्ही रुग्णांनी त्यावर यशस्वी मात केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पुन्हा ओमिक्रॉनची लागण झालेले तीन रुग्ण सापडले आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …