राज्यात १ डिसेंबरपासून पहिली ते चौथीची शाळा पुन्हा सुरू होणार

मुंबई – कोरोनाचा जोर ओसरत असताना, राज्यातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी राज्याच्या टास्क फोर्सने २ दिवसांपूर्वीच हिरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे गुरुवारी होणाºया मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत काय निर्णय होईल, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली. जवळपास दोन वर्षांनंतर आता राज्यातील शाळांमध्ये लहान मुलांचा किलबिलाट ऐकू येणार आहे. पाल्यांना मुलांना शाळेत पाठवण्याची सक्ती नसणार आहे. लवकरच याबाबतची मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात येणार आहेत, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पहिली ते चौथी या वर्गातील मुले लहान असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी प्रामुख्याने शाळांवर असणार आहे. शाळेतले शिक्षक, मुख्याध्यापक आणि शालेय प्रशासनाला यासंदर्भातले योग्य ते आदेश देण्यात येणार आहेत.
राज्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी याआधीपासूनच चौथी ते सातवी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी ५ वी ते १२वी, तर शहरी भागात ८ वी ते १२वीच्या शाळा-महाविद्यालये सुरू झाली होती. त्यानंतर ग्रामीण भागात १ली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी शाळा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू केली होती. त्याची फाइल मुख्यमंत्र्यांना मंजुरीसाठी पाठवली होती. गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत यावर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात पहिलीपासून बारावीपर्यंत सर्व वर्गांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. आगामी काळात या वर्गांसाठी लागू करावयाच्या नियमावलीबाबत टास्क फोर्ससोबत चर्चा केली जाईल. विद्यार्थ्यांच्या पालकांशी, शिक्षकांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांचे कुठेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची काळजी घेतली जाईल. मुलांना एकत्र बसून शिक्षण घेण्याची आवश्यकता तज्ज्ञांकडून व्यक्त केली गेली आहे. त्यानुसार चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे़ सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण वातावरण कसे दिले जाईल, याची काळजी घेतली जाईल, असे देखील वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती देताना नमूद केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …