राज्यात वातावरण बिघडवण्याचे काहींचे कारस्थान; बळी पडू नका – नवाब मलिकांचे आवाहन

मुंबई – महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचे काहींचे कारस्थान आहे. त्याला बळी पडू नका, शांतता पाळा. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या राज्यात शांतता कशी राहिल यावर भर द्या, असे आवाहन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले.

त्रिपुराच्या घटनेच्या निषेधार्थ अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आणि परभणीत प्रचंड हिंसाचार झाला. अशात भाजपनेही अमरावती बंदची हाक दिली; मात्र या बंदलाही हिंसक वळण लागले. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना नागरिकांना शांतता पाळण्याचे आवाहन केले. आंदोलन करणे हा तुमचा अधिकार आहे; पण त्याला हिंसक वळण लागू देता कामा नये. हिंसक आंदोलनाला जे कोणी जबाबदार असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी लोकांनी शांतता ठेवली पाहिजे. पोलीस कायदा, सुव्यवस्था राखतील. नागरिकांनीही हिंसा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शांतता ठेवावी. माथी भडकविणाऱ्यांचे ऐकू नका. राज्यात शांती भंग करण्यासाठी अनेक लोक कारस्थान करत आहेत. त्याला बळी न पडता शांतता राखा, असे आवाहन मलिक यांनी केले.
शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या निषेधार्थ देशात अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्रातही बंद पुकारला गेला. देशातील सलोखा कसा बिघडेल याबाबत वारंवार प्रयत्न सुरू आहेत. पुस्तके लिहिली जात आहेत. विधाने केली जात आहेत. लोकांची भावना दुखावण्याचं काम सुरू आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. नियोजित पद्धतीने देशातील वातावरण कसं बिघडेल हे वसीम रिझवींच्या माध्यमातून सुरू आहे. रिझवी शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन होते. तिथे त्यांनी अफरातफर केली. त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेशात तक्रार दाखल झाली. शिया कम्युनिटीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले; पण सीबीआयने यात कोणतीही कारवाई केली नाही. कोल्ड स्टोरेजमध्ये हे प्रकरण ठेवण्यात आले आहे. या वसीम रिझवींना मोकळीक देण्यात आली असून, त्यामुळे वातावरण बिघडत आहे. रिझवींवर कारवाई करावी. भविष्यात कोणतेही विधानं किंवा लिखानातून देशातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी मलिक यांनी केली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …