राज्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता – हवामान खात्याचा इशारा

पुणे – मागील काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कडाक्याची थंडी जाणवत आहे. त्यानंतर आता राज्यात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. येत्या दोन दिवसांनंतर मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ऐन हिवाळ्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता निर्माण झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बी हंगामात निर्माण झालेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्याची शक्यता आहे.
सध्या वायव्य आणि मध्य भारतात पश्चिमी चक्रीवादळ आणि त्याच्या चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे हरियाणासह उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश या भागांत मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. याचा एकंदरीत परिणाम म्हणून राज्यातही अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. मंगळवारपासून राज्यात कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा विक्रमी घसरला होता. बहुतांशी ठिकाणांचे किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले होते, पण आता उत्तर भारतातील थंडीची लाट ओसरली आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातही गारठा कमी होणार आहे. पुढील पाच दिवस देशात कुठेही थंडीची लाट येण्याची शक्यता नाही. पुढील काही दिवस पुण्यात निरभ्र हवामान राहण्याची शक्यता आहे, पण दोन दिवसांनंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …