
जयपूर – राज्यातील आघाडी सरकार कोसळण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. राज्यातील आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळणार असून, मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असल्याचा दावा केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. माझ्या मनात काही गोष्टी आहेत. त्या आताच सांगणार नाही. सरकार पाडायचे असेल किंवा नवे सरकार आणण्यासाठी काही करायचे असेल, तर अशा गोष्टी उघड बोलायच्या नसतात, असे सूचक विधानही त्यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी आहेत. आजारी माणसाचे नाव घेऊन काही बोलणे योग्य नाही, पण आघाडी सरकारचे लाईफ अधिक नाही, असेही ते म्हणाले.
नारायण राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. राज्यात अनागोंदी कारभार आहे. भाजपचे सरकार नाही, त्यामुळे असे होत आहे. मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील मविआ सरकार फार काळ टिकणार नाही, असे राणे म्हणाले. दरम्यान, नाराणय राणे यांच्या या विधानाबाबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर, राणे काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा टोला परब यांनी लगावला आहे.