राज्यात पावसाचा जोर वाढणार; पुढील ५ दिवस हाय अलर्ट

पुणे – अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव म्हणून मुंबईसह महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाले आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर गेले आहे. आता अंदमानच्या समुद्रात नवीन संकट उभे ठाकले आहे. या ठिकाणीदेखील हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे. पुढील २४ तासांत याची तीव्रता वाढणार आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. शनिवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांसाठी राज्यात विविध ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
शुकवारी सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला गेला होता. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. यासोबतच रत्नागिरी, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या सहा जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. शनिवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
शनिवारी दक्षिण कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार आहे. हवामान खात्याने शनिवारी सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि बीड या दहा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळणार आहे. रविवारपासून (१४ नोव्हेंबर) पुढील तीन दिवस पुण्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तिन्ही दिवसांसाठी पुण्यात येलो अलर्ट जारी केला गेला आहे. या तीन दिवसांत पुण्यासह दक्षिण कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र, घाट परिसर, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …