आधी मुलांचे लसीकरण करा, मगच शाळा सुरू करा
सोमवारच्या बैठकीत होणार निर्णय?
मुंबई – राज्यातील शहरी भागात ८ ते १२ वी आणि ग्रामीण भागात ५ वी ते १२ वीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यानंतर आता राज्यात पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागही अनुकूल असल्याची माहिती समोर आली होती. मात्र कोरोना टास्क फोर्सकडून राज्यातील पहिली ते पाचवी शाळा सुरू करण्याबाबत अनुकूल नाहीत. टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी याबद्दलचा खुलासा केला आहे. शाळा लवकरात लवकर सुरू करायच्या असतील तर लहान मुलांचे लसीकरण सुरू होणे गरजेचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लहान मुलांचे लसीकरण सुरू करावे, असेही डॉक्टर ओक म्हणाले.
राज्याचा शालेय शिक्षण विभाग जरी पहिली ते पाचव्या वर्गांपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत अनुकूल असेल तरी या वर्गांच्या शाळा सुरू करण्याची ही योग्य वेळ नाही. पहिली ते पाचवीच्या शाळा सुरू करण्यास टास्क फोर्स अनुकूल नाही. तसेच विद्यार्थ्यांचे संपूर्ण लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू करणे योग्य होणार नाही, असे मत टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केले आहे.
मुले जवळपास १८ महिने शाळा बाहेर आहेत आणि याच्या दुष्परिणामांची मला पूर्ण कल्पना आहे. मात्र लहान मुले कोविडला बळी पडणार नाहीत याची काळजी टास्क फोर्सला आहे. म्हणूनच पीडियाट्रिक व्हॅक्सिनेशन सुरू व्हावे यासाठी सोमवारच्या मिटिंगमध्ये टास्क फोर्स राज्य सरकारला विनंती करणार आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांचे लसीकरण होत नाही तोपर्यंत शाळा सुरू करणे योग्य ठरणार नाही, असे टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक म्हणाले.
मास्क ही पहिली लस आहे, पण सणात लोकांनी मास्क टाळला, यामुळेच तिसरी लाट येणारच नाही असे म्हणता येणार नाही. अमेरिकेत मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण इतके वाढले की, मुलांना एका राज्यातून दुसºया राज्यात शिफ्ट केले जात आहे. ही परिस्थिती मला माझ्या राज्यात येऊ द्यायची नाही. तिसºया लाटेचा अंदाज चुकल्याचा आनंद मला आहे मात्र तिसरी लाट येणारच नाही असे म्हणता येणार नाही, असेही डॉक्टर ओक म्हणाले.