ठळक बातम्या

राज्यात जमावबंदी लागू

मुंबई – राज्यात ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे. दिवसेंदिवस ओमिक्रॉनचा फैलाव वाढताना दिसत आहे. अशावेळी राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी नव्या नियमावलीची घोषणा केली आहे. त्यानुसार शुक्रवारी रात्रीपासून राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ही जमावबंदी असणार आहे.
ओमिक्रॉनचा प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. सध्याच्या निर्बंधाचे स्वरूप हे प्राथमिक स्वरूपाचे असून, भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांत एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत. ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले आहे.
राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात राज्यात अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल तितकी असेल. इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल तितकी असणार आहे. क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल. उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल. याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यांनी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …