राज्यातील थंडीचा तडाखा

  •  पुणे, नाशिक, साताऱ्यात हुडहुडी
  • महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा शून्य अंशाजवळ

पुणे – राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मंगळवारी व बुधवारी राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरला होता. ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये आणि पाचगणीत हाडे गोठवणारी थंडी पडली होती. महाबळेश्वरात बुधवारी पहाटे

तापमानाचा पारा शून्य अंश सेल्सिअसजवळ पोहोचलेला. त्यामुळे महाबळेश्वरात दवबिंदू गोठतील अशी स्थिती निर्माण झाली होती. अचानक गारठा वाढल्याने अनेकांनी शेकोटी पेटवून स्वत:चा थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला.
बुधवारी पहाटे महाबळेश्वरच्या वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरात तापमानाचा पारा शून्य अंशाजवळ नोंदला गेला. पाचगणीत देखील किमान तापमानात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. खरेतर, दरवर्षी डिसेंबर महिन्यात वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठत असतात, पण यावर्षी डिसेंबर महिन्यात अपेक्षित थंडी पडली नाही. जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. अशात बुधवारी पहाटे महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा शून्य अंशाजवळ पोहोचला. त्यामुळे दवबिंदू गोठण्याची शक्यता निर्माण झाली होती, पण महाबळेश्वरात सुरू असलेल्या वाऱ्यांमुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. पण येत्या काळात असेच हवामान कायम राहिले, तर महाबळेश्वरात तापमानाचा पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. थंडीच्या दिवसात महाबळेश्वर परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अफाट असते, पण यावेळी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पर्यटन स्थळांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. वेण्णा लेक येथील बोटिंगही बंद आहे, तर हॉटेल ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवली आहेत. केवळ लॉजिंग पूर्ण क्षमतेने सुरू आहे. दुसरीकडे, पुण्यात देखील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. गेल्या काही दिवसांत पुण्यात ४ ते ५ अंश सेल्सिअस तापमानाची घट झाली आहे. बुधवारी पुण्यात राजगुरूनगर याठिकाणी सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली. येथील तापमान १०.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. त्यापाठोपाठ माळीण (१०.४), पाषाण (१०.५), हवेली (१०.७), एनडीए (११.१), निमगीरी (११.१), शिवाजीनगर (११.२) आणि तळेगाव येथे ११.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुण्यात अन्य ठिकाणचे तापमान ११ ते १७ अंशच्या दरम्यान आहे. त्यामुळे पुणेकर कडाक्याच्या थंडीने बेहाल झाले आहेत. पुण्यात रस्त्यावर अनेक ठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसल्या आहेत. पुण्याप्रमाणेच नाशिक, मुंबई, कोकण व मराठवाडा, विदर्भात थंडीने आपले रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …