राजू कारेमोरे बारा तासांच्या तुरुंगवासानंतर बाहेर

कारेमोरे पोलिसांविरुद्ध न्यायालयीन लढाईच्या तयारीत

भंडारा – तब्बल १२ तासांच्या तुरुंगवासानंतर आमदार राजू कारेमोरे यांची तुरुंगातून सुटका झाली. पोलिसांद्वारे ५० लाख रुपये व सोनसाखळी चोरीच्या भूमिकेवर आमदार ठाम आहेत. पोलिसांविरुद्ध न्यायालयीन लढाई लढणार असल्याचा निर्धार कारेमोरे यांनी सुटकेनंतर व्यक्त केला.
अखेर तब्बल बारा तासांच्या तुरुंगवासानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर मोहाडी क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांची सुटका झाली. त्यांच्याविरोधात ३१ डिसेंबरच्या रात्री मोहाडी पोलीस ठाण्यामध्ये येऊन गोंधळ घातल्याप्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मोहाडी दिवाणी न्यायालयाने आमदार राजू कारेमोरे यांना १५ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे त्यांना भंडारा येथील तुरुंगात नेण्यात आले होते. कारेमोरे यांच्या वकिलांनी भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात सुटकेसाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर भंडारा सत्र न्यायालयाने आमदार कारेमोरे यांचा अंतरीम जामीन १५ जानेवारीपर्यंत मंजूर केला. परंतु, सोमवारी रात्र झाली असल्याने भंडारा येथील तुरुंगात कारेमोरे यांची रवानगी करण्यात आली होती. नियमानुसार, रात्री आरोपीची सुटका करण्यात येत नाही. त्यामुळे कारेमोरे यांना रात्र भंडाऱ्यातील तुरुंगातच काढावी लागली. मंगळवारी सकाळी जामिनाची प्रत तुरुंगात दाखविल्यानंतर कारेमोरे यांची तुरुंगातून सकाळी ९ वाजता सुटका करण्यात आली. पोलीस आपल्या कर्मचाऱ्यांना वाचवित असल्याचा आरोप राजू कारेमोरे यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर केला. ५० लाख रुपये लुटून नेणाऱ्या पोलिसांना अधिकारी वाचवित आहेत. आमचे घामाचे पैसे आहेत. हरामाचे पैसे नाहीत. त्यामुळे आता ही लढाई कोर्टातून लढू, असा पुनरुच्चार राजू कारेमोरे यांनी केला. पोलिसांनी अशाप्रकारे लोकांचे पैसे लुटून नेले, तर लोकांनी विश्वास कुणावर ठेवायचा, असा प्रश्नही कारेमोरे यांनी विचारला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …