ठळक बातम्या

राजकीय साहित्य संमेलन

गेल्या वर्षी कोरोनामुळे स्थगित झालेले साहित्य संमेलन आता पुढील महिन्यात होत आहे. त्यामुळे या वर्षाची अखेर तरी गोड होईल, अशी अपेक्षा आहे. अर्थात साहित्य संमेलने काही गोड असतातच असे नाही; पण या साहित्य संमेलनाला प्रथमच वैज्ञानिक, विज्ञानवादी साहित्यिक अध्यक्ष म्हणून लाभले असल्यामुळे त्याची उत्सुकता आहे. साहित्य संमेलन हे राजकारणाचे अड्डेच असतात हे नक्कीच; पण ज्यावेळी राजकारण्यांना विरोध केला जातो, तेव्हा साहित्यिकांची तिरडी काढली जाते, अशी प्रथा आहे. १९७७ साली कराड येथे झालेल्या साहित्य संमेलनात महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या पु. ल. देशपांडे यांचा असाच अवमान झालेला होता. त्यामुळे एक दुर्गा भागवत सोडल्या, तर तसे कोणातही धाडस नाही की, राजकारण्यांना विरोध करू शकेल. त्यामुळे नाशिकला पुढील महिन्यात होणाºया राजकीय साहित्य संमेलनाची नेमकी काय अवस्था असेल आणि ते कसे रंगतदार असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

साहित्य संमेलन आणि वाद या परंपरेचा मान राखत नाशिकच्या संमेलनाचीही नांदी झाली आहे. खरं तर मार्चमध्ये होणारे हे संमेलन आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे; मात्र जानेवारीत नाशिकला मिळालेल्या संमेलन संधीपासून आजपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे, म्हणजे कोविडकाळात नाशिक हॉटस्पॉट असतानाही नाशिककर संमेलनासाठी उत्सुक असल्याचे पाहून साहित्य महामंडळाच्या पदाधिकाºयांना आपल्या मनातील संमेलनाध्यक्ष बसवण्याची खात्री वाटू लागली होती; पण ऐनवेळी मराठवाड्यातीलच एक पदाधिकारी फुटून आपसात राजकारण झाले आणि अध्यक्षपदासाठी डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
नाशिकमधील संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालायची, हादेखील प्रश्न होताच, कारण आयोजक असलेल्या लोकहितवादी मंडळाची आर्थिक परिस्थिती तशी कमजोरच होती. त्यामुळे याला राजाश्रय मिळाल्याशिवाय ते दणकेबाज होणार नाही. तसे सरकारकडून साहित्य संमेलनाला २५ लाख रुपये मिळतात; पण ती रक्कम आजच्या काळात खूपच कमी वाटते. त्यामुळे साहित्यिकांच्या पुस्तकांप्रमाणेच जिथे नोटाही छापल्या जातात, अशा नाशिकमध्ये पैशाला तोटा कसा कमी पडेल? त्यासाठी मग स्वागताध्यक्षपद नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे गेले. आता इतके छान व्यासपीठ मिळणार म्हटल्यावर छगन भुजबळ ती संधी कशी सोडणार? संधीचे आणि व्यासपीठाचे सोने करणे हे तर भुजबळांच्या डाव्या हाताचा मळ असल्यासारखेच आहे. त्यामुळे भुजबळांमार्फत साहित्य संमेलनाचा केंद्रबिंदू काहीसा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सरकत गेला, मग शरद पवारांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा संमेलनाच्या निमित्ताने घडवण्यापासून ते येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संमेलन राष्ट्रवादी कसं हायजॅक करू पाहत आहे, ही चर्चाही होत राहिली.

खरं तर नाशिकवर सर्वच पक्षांचा डोळा आहे. अगदी शिवसेना, मनसे, भाजप यांचा डोळा आहेच; पण महापालिका निवडणुकांपूर्वी जर इतकी चांगली संधी आली आणि त्यात शरद पवारांचा सोहळा करता आला, तर राष्ट्रवादीचे ते साहित्य संमेलन महत्त्वाकांक्षी असणार आहे. त्यात बाजी मारण्यासाठी भुजबळ आपले दोन्ही भूजा सरसावून बळ लावणार यात शंकाच नाही. आता भुजबळांकडे संमेलन गेलंच आहे आणि त्यांचीच शिक्षण संस्था आहे म्हटल्यावर संमेलनस्थळ तरी दुसरे कशाला हवे? खरं तर साहित्य महामंडळाने हे संमेलन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात करण्याचे ठरवले होते; पण राष्ट्रवादीकडे हे संमेलन सरकल्यामुळे महामंडळाने ठरवलेल्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मैदानाकडे पाठ फिरवत आता संमेलनाचा मांडव भुजबळ नॉलेज सिटीत पडणार आहे, म्हणजे यातही महामंडळाने ठरवलेले ठिकाण नाकारत हवा तसा बदल करून संमेलनस्थळच शहराबाहेर नेण्यात आयोजक यशस्वी झाले. महामंडळाच्या अध्यक्षांनी १९ ते २१ नोव्हेंबर या तारखांचे पत्र दिलेले असतानाही स्वागताध्यक्षांनी मात्र ३ ते ५ डिसेंबर या संमेलनाच्या तारखा जाहीर केल्याने जायचा तो संदेश गेलाच आहे, म्हणजे आज बातमी १९ नोव्हेंबरला साहित्य संमेलन होणार अशी येते आणि दुसºया दिवशी त्याची तारीख बदललेली असते.
खरं तर जयंत नारळीकर हे या संमेलनाचे खरे आकर्षण ठरायला पाहिजे; पण आपल्या अमोघ वक्तृत्वाने हे संमेलन छगन भुजबळ गाजवणार आणि तिथे राजकीय समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न करणार. महापालिका निवडणुकांची नांदी सुरू होण्यापूर्वीच हा राष्ट्रवादीचा प्रचाराचा फुटलेला नारळ असेल. संमेलनाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती ही अनिवार्य असते. त्यामुळे या व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पण हात फिरवून घेतील, यात शंकाच नाही; पण साहित्य संमेलनेही राजकीय व्यासपीठ होताना दिसत आहेत, हे पुन्हा एकदा दिसून आले. म्हणजे, कुसुमाग्रजांच्या नावाने आपण मराठी भाषा दिन साजरा करतो; पण त्यांची कर्मभूमी असलेल्या नाशिकचे साहित्य संमेलन हे मात्र राजकीय वातावरणात घुसळून निघणार हे नक्की.

खरं तर आपल्याकडे निरनिराळी साहित्य संमेलने भरत असतात. विद्रोही साहित्य संमेलन, संत साहित्य संमेलन, स्त्री साहित्य संमेलन वगैरे वगैरे. त्याप्रमाणे एखादे राजकीय साहित्य संमेलन का भरत नाही, अशी शंका अनेक दिवस होती, कारण यशवंतराव चव्हाण, नरसिंहराव अशांसारखे अनेक विद्वान साहित्यिकांची महाराष्ट्राला परंपरा आहे. त्यात आजकाल प्रत्येक नेता आत्मचरित्रही लिहू लागला आहे. त्यामुळे त्यांचीही वर्णी साहित्यिक म्हणून होताना दिसत आहे. असे असताना राजकीय साहित्य संमेलन का होत नव्हते? तर हे संमेलन हायजॅक करणे सोपे असल्याने वेगळे संमेलन घेण्याची गरज वाटत नसावी.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment