रवी शास्त्रींच्या ‘त्या’ विधानाने माझे खच्चीकरण केले होते – आर अश्विन

नवी दिल्ली – २०१८-१९च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आर. अश्विनने निवृत्तीचा विचार सुरू केला होता, असे धक्कादायक विधान आले होते. या दौऱ्यात मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या एका विधानाने आपले खच्चीकरण केल्याचा दावा आर. अश्विनने केला आहे. कपिल देव यांचा कसोटी क्रिकेटमधील ४३४ विकेट्सचा विक्रम तोडण्यासाठी अश्विनला केवळ ८ बळी टिपायचे आहेत आणि तो भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज बनेल. असे असतानाही २०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एका प्रसंगाने मनात नैराश्य पसरल्याचे अश्विनने मान्य केले. त्या दौऱ्यातील अखेरचा सामना सिडनीत खेळवला गेला आणि त्यात कुलदीप यादवने पाच विकेट्स घेत यजमानांना बॅकफूटवर फेकले होते. त्यानंतर रवी शास्त्री यांनी ते विधान केलेले. शास्त्री म्हणाले होते की, कुलदीप यादव परदेशात कसोटी क्रिकेट खेळलाय आणि त्याने आज पाच विकेट्स घेतल्या. तो आता परदेशात भारताचा प्रमुख फिरकीपटू बनला आहे. पुढेही जेव्हा आम्हाला एकाच फिरकीपटूसह मैदानात उतरावे लागले, तर तोच आमची पहिली निवड असेल. कदाचित इतरांना संधी मिळू शकते (अश्विनचे नाव न घेता), परंतु आता कुलदीप हाच परदेशात टीम इंडियाचा नंबर वन कसोटी फिरकीपटू आहे. एका क्रीडा संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत अश्विन म्हणाला की, कुलदीप यादवसाठी मी आनंदी होतो, परंतु शास्त्रींच्या त्या विधानाने माझे खच्चीकरण केले आणि मला असे वाटले की, मला बसखाली फेकले आहे. तो पुढे म्हणाला, मी रवी भाईचा आदर करतो, आम्ही सर्वच करतो. आपण काही गोष्टी बोलतो आणि त्या मागेही घेतो, हे मी समजू शकतो, पण त्याक्षणी मी खचलो. सहकाऱ्याच्या यशाचा आनंद साजरा करणेही महत्त्वाचे आहे आणि मी कुलदीपसाठी आनंदी होतो. मला ऑस्ट्रेलियात पाच विकेट्स घेता आल्या नाहीत, परंतु त्याने ते केले. हे खूप मोठे यश आहे. चांगली गोलंदाजी करूनही मला पाच विकेट्स घेता आल्या नाहीत. त्यामुळे मी खरंच कुलदीपसाठी आनंदी होतो, पण त्यांच्या विधानानंतर मला बसखाली फेकले असे वाटले आणि मनात अशी कालवाकालव सुरू असताना सहकाऱ्याच्या आनंदात मी कसा सहभागी होऊ? मी रूममध्ये परतलो आणि पत्नीशी याविषयी बोललो. माझी मुलेही तिथे होती. त्यानंतरही मी पार्टीत सहभागी झालो, कारण सरतेशेवटी आम्ही मोठा मालिका विजय मिळवला होता. या मालिकेतील पहिल्या कसोटीत आर. अश्विनने सहा विकेट्स घेतल्या होत्या आणि भारताने ३१ धावांनी मिळवलेल्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता, पण दुखापतीमुळे पुढील तीन सामन्यांत त्याला खेळता आले नाही. मालिकेनंतर अश्विनची पहिल्या कसोटीतील कामगिरी सर्व विसरले होते. कारण तेव्हा चर्चा आणि तुलना सुरू झाली होती. चार सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली होती. त्यात अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यांनी अनुक्रमे ६, ७ व ५ विकेट्स घेतल्या होत्या.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …