ठळक बातम्या

रणरागिणी ‘महाराणी ताराराणी’ साकारताना खूप गोष्टी नव्याने शिकले – स्वरदा

हिंदी आणि मराठीच्या छोट्या पडद्यावरील एक ओळखीचा चेहरा म्हणजे अभिनेत्री स्वरदा थिगळे. मराठी मालिकेच्या माध्यमातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणारी स्वरदा १५ नोव्हेंबरपासून सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत महाराणी ताराराणी यांच्या मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. त्यानिमित्ताने तिने मारलेल्या गप्पा.

तू अनेक वर्षांनी मराठीत पुन्हा मालिका करतेस, कसं वाटतंय?
– निश्चितच सुरेख अनुभव आहे. वाहिनी आणि प्रोडक्शन दोघांनीही याआधी ऐतिहासिक मालिका केली आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आणि ऐतिहासिक माहितीचा मला खूप फायदा होतोय. संपूर्ण टीम खूप छान काम करत आहे. आपला इतिहास, संस्कृती, साडी कशी नेसायची, वेगवेगळे दागिने अशी प्रत्येक गोष्ट मी नव्याने शिकत आहे. सेटवर वातावरण खूप सकारात्मक असतं. सहकलाकार मस्त आहेत. त्यामुळे एकंदरीत माझा हा अनुभव फारच समाधानकारक आहे.

भूमिकेचं काही दडपण आहे का?
– दडपण नाहीये. मी जे साकारते ते प्रत्यक्षात टीव्हीवर कसं दिसणार याची उत्सुकता नक्कीच आहे. मी आजतागायत मालिकेचा एकही एपिसोड पाहिलेला नाही. सिन्स करताना कलाकार त्यात समरस झालेले असतात, त्यामुळे प्रेक्षकांना ते कसं वाटेल हे आम्हाला कधीकधी समजत नाही. त्यामुळे एपिसोड नक्की कसा झालाय, त्यातलं माझं काम या सगळ्याची मला उत्सुकता आहे.

तू तलवार, घोडेस्वार हे शिकलीस. मालिकेच्या निमित्ताने पुन्हा हे सगळं करताना कसं वाटतंय?

– मी घोडेस्वारी आधीपासून शिकले आहे. मुळातच मी एक धावपटू आणि राज्यस्तरीय जलतरण चॅम्पियन आहे, तसंच नृत्य आणि संगीत याचीही मला खूप आवड आहे. धावपटू असल्याने माझी इच्छा होती की, या सगळ्या गोष्टी उपयोगाला येतील, अशी भूमिका साकारायला मिळावी. ताराराणी या व्यक्तिरेखेसाठी विचारणा झाली, तेव्हा तर मी फार खूश झाले कारण मी शिकलेल्या, मला आवडत असलेल्या गोष्टींचा उपयोग मला करता येणं शक्य आहे. माझी आणि आई-बाबांची मला हे सगळं शिकवण्याची मेहनत सार्थकी लागली, असं वाटतंय.
ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारत आहेस. तुझ्या लूकवर, भाषेवर कसा अभ्यास केलास?

– माझा अभ्यास अजूनही सुरूच आहे. ताराराणींशी निगडीत जी पुस्तकं आहेत, ती मी वाचत आहे. सौराज्य सौदामिनी ताराराणी हे पुस्तक वाचून भाषेवर काम करत आहे. प्राणायाम, योग या सगळ्याच्या मदतीने श्वासावर नियंत्रण कसं ठेवता येईल, यावर लक्ष देते. ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना आवाज, भाषा या सगळ्याच गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. विशिष्ट लयीत, टोनमध्ये वाक्यं कशी बोलायची, याचाही अभ्यास सुरू आहे. बाराखडी, शब्दांची बांधणी अशा बारीकसारीक गोष्टींपासून व्यक्तिरेखा कशी छान होईल, याच प्रयत्नात मी आहे.
मॉडर्न स्वरदा ते ताराराणी हा प्रवास कसा होता?

– प्रवास थोडा अवघड होता, कारण पारंपरिक वेशभूषा, दागिने या सगळ्यांसोबत वावरणं याचा एक वेगळा औरा असतो. रोजच्या आयुष्यात आपण मॉडर्न कपडे घालतो आणि त्याने आपल्याला आरामदायी वाटतं; पण पारंपरिक वेशभूषाही परिधान करायला तितक्याच सोप्या आहेत आणि त्याला स्वत:चे एक वेगळेपण असते. आता नक्कीच एक जबाबदारी वाढली आहे. ताराराणींचा वावर कसा असावा, विशिष्ठ पद्धतीने चालणं यासाठी मी खूप सराव केला आहे आणि गोष्टी माझ्यासाठी सोप्प्या आल्या.
ताराराणी हे पात्रं तुला काय शिकवतंय?

– माझी खरंतर अजून सुरुवात आहे. बराच मोठा पल्ला मला गाठायचा आहे; पण जसजसं चित्रीकरण सुरू होतंय तसतसं नवनवीन गोष्टी माझ्याही नकळत मी शिकत आहे. ताराराणींची शिस्त, धाडसीपणा, जोखीम उचलण्याची वृत्ती, सगळ्यांची मतं विचारून घेऊन मगच निर्णय घेणं इत्यादी अनेक गुणांनी माझ्यावर छाप पाडली आहे. शिकण्याचा हा एक प्रवास आहे, जो आता कुठे सुरू झालाय, त्यामुळे काही दिवसांनी या प्रश्नाचं उत्तर मी अजून छान प्रकारे देऊ शकेन.
ताराराणीच्या ऑडिशनच्या वेळेस अनेक नायिका या पात्रासाठी आल्या होत्या. त्या सगळ्यांमधून तुझी निवड झाली, हे समजल्यावर काय भावना होती?

– माझ्यासाठी खूपच आनंदाची बातमी होती. ऐतिहासिक भूमिका त्यातही सौदामिनी ताराराणी, सोनी मराठी वाहिनी, जगदंब प्रोडक्शन, डॉ. अमोल कोल्हे हे सगळंच गणित छान जुळून आलं. हे पात्रं साकारायला मिळतंय यासाठी मी खरंच स्वत:ला खूप नशीबवान समजते. पहिला प्रोमो येण्याआधी थोडं दडपण आलं होतं; पण प्रोमो आल्यावर जेव्हा सगळ्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं, तेव्हा छान वाटलं आणि मग मी ठरवलं की, आता अजून आत्मविश्वाने काम करायचं.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …