लखनऊ- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या राजकीय हालचाली होताना दिसत आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप, काँग्रेस, सपासह इतर पक्ष राजकीय समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने एक महत्त्वाचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन होणार आहे, मात्र यावेळी भाजप तसेच उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणूक जिंकण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
या सर्वेक्षणामध्ये उत्तर प्रदेशची चार भागांत विभागणी केली गेली आहे. यूपीच्या सर्वच म्हणजेच ४०३ जागांवर हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार भाजपला यावेळी २३९ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर समाजवादी पार्टीला एकूण १४४ जागा मिळू शकतात. यावेळी बसपा आणि काँग्रेस मतदारांवर काही प्रभाव पाडणार नसल्याचे या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार बसपाला १२ तर काँग्रेसला फक्त सहा जागा मिळण्याची शक्यता आहे.
दिल्लीच्या सीमांवर चाललेल्या तसेच शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या घटनेचा फटका भाजपला बसेल असे सांगण्यात येत आहे, मात्र पश्चिम यूपीमध्ये भाजप मोठ्या प्रमाणात जागा जिंकण्याची शक्यता आहे. तेथे भाजपला ९७ जागांपैकी ५७ ते ६० जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सपा ३५ ते ३८ जागा जिंकू शकते. पूर्वांचल भागात भाजपला यावेळी मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तेथे भाजपला मागच्या निवडणुकीत ७४ जागांवर विजय मिळाला होता, मात्र यावेळी भाजपला येथे फक्त ४९ ते ५८ जागा मिळण्याची शक्यता आहे. या भागात सपाही चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. येथे सपाला ३९ ते ४५ जागांवर विजय मिळू शकतो. मागील निवडणुकीत सपाला या भागात १२ जागा मिळाल्या होत्या.
सर्वेक्षणानुसार रुहेलखंड या भागात भाजपला ३० ते ३६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर सपाला १७ ते १८ जागा, बसपाला एक किंवा दोन जागा तर काँग्रेसला फक्त एक जागा मिळण्याची शक्यता आहे. बुंदेलखंड भागात एकूण १९ जागा आहेत. यापैकी १४ ते १५ जागांवर भाजप विजय मिळवण्याची शक्यता आहे, तर सपाला ३ ते ५ आणि बसपाला एक जागा मिळू शकते.
मध्य उत्तर प्रदेशमध्ये ३५ जागांवर सर्वेक्षण करण्यात आले होते. येथे भाजपला १७ ते २१ जागा मिळू शकतात. तर सपाला १२ ते १३ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजप आणि बसपा यांच्या खात्यात एक, एक जागा जाण्याची शक्यता आहे. अवध भागात ९८ जागा आहेत. पैकी ५७ ते ६५ जागांवर भाजप उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, तर समाजवादी पार्टीला ३१ ते ३३ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या खात्यात दोन ते तीन तसेच बसपाकडे तीन जागा जाण्याची शक्यता आहे.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …