लखनऊ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय होऊन सत्ता आली, तर आमचे सरकार राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींना स्मार्टफोन आणि इलेक्ट्रिक दुचाकी देईल, अशी घोषणा गुरुवारी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली. आपल्यासोबत सेल्फी घेणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मुद्यावरून त्यांनी योगी सरकारवर टीकेची झोडही उठवली. काँग्रेस येत्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात ४० टक्के जागांवर महिला उमेदवार उभे करणार आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रियंकांनी ही घोषणा केली होती. त्यानंतर आता त्यांनी सरकार आले, तर विद्यार्थिनींना स्मार्टफोन आणि दुचाकी देण्याचेही आश्वासन देत इतर पक्षांच्या तुलनेत प्रचारात आघाडी घेतली आहे.
बुधवारी मी काही विद्यार्थिनींना भेटले. त्या मुलींनी शिक्षण आणि सुरक्षेसाठी स्मार्टफोनची गरज असल्याचे मला सांगितले. पक्षाच्या घोषणा समितीने याबाबत विचार केला. त्यानुसार उत्तर प्रदेशात काँग्रेसची सत्ता आली, तर बारावी पास मुलींना स्मार्टफोन आणि पदवीधारक विद्यार्थिनींना इलेक्ट्रिक स्कुटर दिली जाईल, असे ट्विट प्रियकांनी केले. त्यांनी आपल्या ट्विटसोबत एक व्हिडीओ देखील शेअर केला. यामध्ये प्रियंका गांधी काही विद्यार्थिनींसोबत बोलताना दिसत आहेत.
दरम्यान प्रियंका गांधींसोबत सेल्फी घेणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर प्रियंकांनी योगी सरकारवर टीका केली. माझ्यासोबत महिला पोलीस सेल्फी घेत असल्याचे बघून योगी दु:खी झाले आहेत. त्यामुळे आता ते त्या महिला पोलिसांवर कारवाई करणार आहेत. माझ्यासोबत फोटो घेणे गुन्हा असेल, तर मला त्याची शिक्षा द्या. कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांचे करिअर खराब करणे सरकारला शोभत नाही, अशी टीका प्रियंकांनी केली आहे. आग्रा येथे पोलीस कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या एका आरोपीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी बुधवारी प्रियंका जात असताना, त्यांना पोलिसांनी अडवले होते. त्यावेळी काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रियंकांसोबत सेल्फी घेतली. पोलीस प्रशासनाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …