ठळक बातम्या

म्हाडा पेपरफुटीप्रकरणी सहा जणांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पुणे – आरोग्य विभागापाठोपाठ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या रविवारच्या (दि. १२) नियोजित परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी सायबर पोलीस शाखेने सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. संतोष लक्ष्मण हरकळ, अंकुश रामभाऊ हरकळ (दोघे रा. बुलढाणा), डॉ. प्रितीश देशमुख (खराळवाडी), अजय चव्हाण (औरंगाबाद), कृष्णा जाधव (औरंगाबाद), अंकित चनखोरे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
आरोग्य विभागाच्या पेपरफुटीप्रकरणी सायबर विभागाचा तपास सुरू असताना ‘म्हाडा’च्या परीक्षेचा पेपर फुटणार याची कुणकुण पोलिसांना लागली होती. त्यानुसार, पोलिसांनी शहरातील तसेच औरंगाबाद, जालना, बीड, ठाणे या भागांतील काही संस्थांवर लक्ष केंद्रित केले होते. औरंगाबादमधून टार्गेट करिअर पॉइंटचा संचालक अजय चव्हाण व सक्षम ॲकॅडमीचा संचालक कृष्णा जाधव यांच्यासह अंकित चनखोरे यांना पोलिसांनी शनिवारी (दि. ११) ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून हरकळ बंधू व डॉ. देशमुख यांच्या रॅकेटची माहिती बाहेर आली. त्यानुसार, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे व त्यांच्या पथकाने रातोरात छापेमारी करून संतोष लक्ष्मण हरकळ, अंकुश रामभाऊ हरकळ, डॉ. प्रितीश देशमुख या तिन्ही आरोपींना जेरबंद केले. त्याच्या झडतीमध्ये प्रश्नपत्रिकेच्या प्रती महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला. पोलिसांनी ही माहिती ‘म्हाडा’ला कळविल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. हरकळ हा पेपरफुटी प्रकरणात एजंट आहे; तर देशमुख म्हाडाची परीक्षा घेणाऱ्या जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा पेपर सेट करणारा अधिकारी आहे. या प्रकरणात अन्य कोणी सामील आहे किंवा कसे?, याबाबत तपास सुरू आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …