…म्हणून शरद पवारांना खुलेआम चर्चा करण्यास भाग पाडले – गोपीचंद पडळकर

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवली म्हणून शरद पवारांना खुलेआम चर्चा करावी लागली, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. एसटी कृतीसमितीसोबत शरद पवार यांनी सोमवारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्याबाबत पडळकरांनी मंगळवारी प्रश्न उपस्थित केला.

दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप कायम आहे. काही कर्मचारी कामावर परतले असले, तरी काही एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. अशातच सोमवारी शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, एसटीची बांधिलकी प्रवाशांशी आहे, त्यामुळे एसटी सुरूझाली पाहिजे यावर एकमत झाल्याची माहिती खासदार शरद पवारांनी बैठकीनंतर दिली. आता त्याबाबत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब यांना एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच महसुलात घट झाल्यानेच शरद पवारांना चर्चा करण्यास भाग पडले, असा दावा त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांनी एकजुटीने लढा दिला, यासाठी मी अभिनंदन करतो. कोणत्याही युनिअनची सभासद फी भरली नाही, महसुलात घट आणली त्यामुळेच शरद पवारांना तुमच्यासोबत चर्चा करण्यास भाग पाडले, तसेच अनिल परब यांना विनंती करायची की, आपण हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सगळे दरवाजे ठोठावत आहात, त्यापेक्षा स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाही? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले की, अनिल परब यांनी स्वत: भेटावे आणि ठामपणे आश्वासित करावे की, बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल, जेणेकरून चर्चेचा मार्ग मोकळा होईल. तसेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होतेच की, मी माझ्या मंत्र्यांना स्वत: मोर्चाला समोरे जाण्यास सांगेन. माझ्या विनंतीचा नाही, तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पावले पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा, चर्चा करा आणि यावर तोडगा काढा.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …