मुंबई – दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. दौऱ्यावर जायच्या आधी मुंबईमध्ये सराव करताना रोहित शर्माला दुखापत झाली आहे. त्यामुळे कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माऐवजी टीममध्ये प्रियांक पांचाळ याचा समावेश करण्यात आला आहे, मात्र क्रिकेट जगतात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. शर्माऐवजी प्रियांक पांचाळला का संधी दिली?, या बॅट्समनमध्ये इतके काय खास आहे?, असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कारण, प्रियांकने टीम इंडियाकडून ना टी-२० ना वनडे खेळली आहे.
रोहित शर्माच्या जागी प्रियांक पांचाळची निवड करण्यामागे पाच ठोस कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, ३१ वर्षांचा प्रियांक अनुभवी खेळाडू आहे. तो नुकताच भारत-अ संघासोबत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. तिथे त्याने ओपनिंग करताना ९६ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेच्या उसळत्या खेळपट्टीवर आणि वेगवान गोलंदाजांसमोर सलामी देताना ९६ धावा करणे सोपे नाही, परंतु प्रियांकने ते करून दाखवले.
प्रियांकची भारतीय कसोटी संघात निवड होण्याचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे भारत-अ संघासोबतचा त्याचा दीर्घकाळ संबंध. दक्षिण आफ्रिकेपूर्वीही प्रियांकने भारत-अ संघासोबत अनेक देशांचे दौरे केले आहेत. यापूर्वी तो २०१९ मध्ये भारत-अ संघासोबत वेस्ट इंडिजला गेला होता. तो त्याच वर्षी श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर भारत-अ संघाकडून खेळला होता. प्रियांकने दोन्ही वेळी शानदार फलंदाजी केली. त्यानंतर श्रीलंका-अ विरुद्ध प्रियांकने कसोटीत एकाच दिवसात १६० धावा केल्या होत्या.
त्यावेळी श्रीलंका-अ संघात अकिला धनंजया आणि लक्ष संदाकनसारखे फिरकीपटूही होते. त्यावेळी अनुभवी फलंदाजांची चालली नाही. मात्र, त्याला तोंड देत प्रियांकने मोठी खेळी खेळली. भारताने श्रीलंका-अ संघाचा २-० असा पराभव केला. याशिवाय प्रियांकने वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन अनौपचारिक कसोट्यांत भारत-अ च्या विजयातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर पोर्ट ऑफ स्पेनमधील दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावांत त्याने अर्धशतक केले. गेल्या काही वर्षांपासून त्याचा दिलीप ट्रॉफीमध्ये आणि भारत-अ संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये समावेश आहे. भारतातील प्रथम श्रेणी सामन्यांत इतर फलंदाजापेक्षा त्याने जास्त धावा केल्या आहेत. प्रियांकला १०० प्रथम श्रेणी सामने खेळण्याचा अनुभव आहे. यामध्ये त्याने २४ शतके आणि २५ अर्धशतकांसह एकूण ७०११ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत. देशांतर्गत प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये त्याची नाबाद ३१४ ही सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.
ट्विट व्हायरल
मुंबई – दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माच्या जागी प्रियांक पांचाळ याची निवड करण्यात आल्यानंतर त्याने ट्विट करीत सर्वांचे आभार मानले आहेत. भारताची जर्सी घालण्याची संधी मिळाल्याने मला गौरवण्यात आले आहे, असे वाटत आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद बीसीसीआय. आपल्या सर्व शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार. मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहे! अशा आशयाचे ट्विट करीत प्रियांकने आनंद व्यक्त केला आहे. तसेच, मला आनंद आहे की, कठोर परिश्रम आणि चिकाटीने दक्षिण आफ्रिकेचे तिकीट मिळाले. फक्त तीन दिवसांपूर्वी, मी दक्षिण आफ्रिकेतून भारत-अ दौरा करून मायदेशी परतलो होतो. मी माझे सामानही नीट उघडले नाही आणि तेवढ्यात मला मोठी संधी मिळाली अशी भावना त्याने व्यक्त केली. गेल्या काही वर्षांपासून मी गुजरात आणि भारत-अ संघांसाठी चांगली कामगिरी करीत आहे आणि मी अनेक वर्षांपासून या संधीची वाट पाहत होतो. पण मला या संधीची अपेक्षा नव्हती. हे एक सुखद आश्चर्य आहे, असेही त्याने ट्विटमध्ये नमूद केले आहे.