मृतांमध्ये १० बालकांचा समावेश
मेक्सिको – गुन्हेगारीचे माहेरघर असलेल्या मेक्सिकोत एका मालवाहू ट्रकला शुक्रवारी अपघात घडला असून, यात सुमारे ५३ शरणार्थी मृत्युमुखी पडले आहेत. मृतांमध्ये १० बालकांचा समावेश आहे. या शिवाय ५४ जण जखमी झाले आहेत. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. तर, २१ जणांना गंभीर इजा झाली असून या सर्वांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिक पोलीस प्रमुख लुईस मॅनुअल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मेक्सिकोतील चियापास राज्यातील एका महामार्गावर शरणार्थ्यांना घेऊन भरधाव जाणारा ट्रक अपघातग्रस्त झाला. यात ५३ जणांचा बळी गेला. घटनास्थळी पादचारी मार्गावर मृतदेह अस्ताव्यस्त स्थितीत पडल्याचे दिसून आले. या अपघातातील पीडित शरणार्थी हे मध्य अमेरिकेतील असल्याचे समजते. काही जण शेजारील ग्वाटेमाला व होंडूरासचे रहिवासी आहेत. मात्र, त्यांच्या नागरिकत्वाची अद्यापही पुष्टी झालेली नाही. हे सर्व शरणार्थी दक्षिण मेक्सीकोतून अमेरिकेत अवैधरित्या जात होते. परंतु, रस्त्यातच काळाने झडप घातल्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला. या मालवाहू ट्रकमध्ये क्षमतेहून अधिक शरणार्थ्यांना कोंबण्यात आले होते. सुमारे १०७ जण या ट्रकमध्ये होते. त्यामुळेच अपघात घडला व ट्रक एका पुलावर जाऊन आदळला, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. ग्वाटेमालाचे राष्ट्राध्यक्ष अलेजांद्रो जियामाटेई यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पीडितांना राजदूतांमार्फत सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
राजस्थानमधील सर्व ९ ओमिक्रॉन बाधित निगेटिव्ह
जयपूर – राजस्थानमधील जयपूरमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या नवीन प्रकारातील सर्व ९ पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. राजस्थानच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व रुग्णांना आरयूएचएस रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासोबतच त्यांना सात दिवस विलगीकरणामध्ये राहण्यासही सांगण्यात आले आहे. जयपूरमध्ये ५ डिसेंबर रोजी ९ जणांना कोरोना विषाणूच्या ‘ओमिक्रॉन’ या नवीन प्रकाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी चार जण दक्षिण आफ्रिकेतून परतले होते आणि पाच जण त्यांच्या संपर्कात आलेले नातेवाईक होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या कुटुंबासह त्यांच्या संपर्कात आलेल्या ३४ लोकांचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी नऊ जणांना ओमिक्रॉनची लागण झाली होती, तर २५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …