मृत्यूची माहिती असतानाही केला यादीत नावाचा समावेश

– दिवंगत स्वप्नील लोणकरचे एमपीएससीच्या अंतिम यादीत नाव

– एमपीएससीचा संतापजनक कारभार
पुणे – एमपीएससी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने २९ जूनला आत्महत्या केली होती. मुलाखतीची यादी जाहीर होत नसल्याचे पाहता, स्वप्नीलने नैराश्यातून आत्महत्या केलेली. या घटनेला आता सहा महिने उलटले, पण दुर्दैवाची बाब म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवे (२०१९)च्या मुलाखतीसाठीच्या यादीत त्याचे नाव आले आहे. धक्कादायक म्हणजे, स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर पुण्यात शेकडो स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली. आयोगाने स्वप्नीलच्या कुटुंबीयांना पाठवलेल्या पत्रातही मृत्यूचा उल्लेख आहे, असे असताना स्वप्नीलचे नाव अखेरच्या यादीत समाविष्ट करत, आयोगाने एकप्रकारे क्रूर चेष्टा केल्याची भावना त्याच्या कुटुंबीयांप्रमाणेच विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. जीव गेल्यानंतर यादीत नाव येण्याचा उपयोग काय?, हे आयोगाने स्पष्ट करावे, तसेच विद्यार्थ्यांचा जीव घेतल्यानंतर एमपीएससीला जाग आली का?, असा प्रश्नही अनेक विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना स्वप्नीलचे वडील म्हणाले की, माझ्याकडे एमपीएससी आयोगाचे पत्र आहे. त्यात स्वप्नीलच्या मृत्यूचा उल्लेख आहे. महाराष्ट्र सरकारलाही याची माहिती असताना, एमपीएससी मुलाखतीसाठी तारीख जाहीर करत आहे. याचा अर्थ तो कच्चा नव्हता, तो हुशार होता. एक हजार एक टक्का एमपीएससीने माझ्या मुलाचा बळी घेतला. इतकंच नाही, तर एमपीएससी आमच्या लोणकर कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत होत नसल्याने व नोकरीचे स्वप्न पूर्ण होत नाही, हे पाहता स्वप्नीलने आत्महत्या केली होती. ज्या कारणासाठी त्याने आत्महत्या केली, त्या मुलाखतीच्या यादीत त्याचे नाव आले खरे मात्र मुलाखतीला जाण्यासाठी स्वप्नील नसणार आहे. त्यामुळे ज्या मेहनतीने त्याने या स्पर्धा परीक्षांची तयारी केली, परीक्षा उत्तीर्णही झाला. मात्र, मुलाखत होत नसल्याने व नोकरी नसल्याने आत्महत्या केलेल्या स्वप्नीलचे मुलाखत यादीत नाव येऊनही त्याला व त्याच्या कुटुंबीयांना काय फायदा झाला?, असा प्रश्न जनमानसात उपस्थित होत आहे. दरम्यान, एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही दोन वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेले कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …