मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी


आज देशातील जनतेचे खूप प्रश्न आहेत; पण काम करणाºयांना काम करू द्यायचे नाही आणि स्वत: काही काम करायचे नाही, असा धंदा सध्या राजकारणात होताना दिसत आहे. उठसूट सकाळ झाली की, पत्रकार परिषद घ्यायची आणि काही तरी राळ उडवून द्यायची. त्यात काही तथ्य नसते, हे त्यांनाही माहिती असावे; पण लोकांचे अन्य महत्त्वाच्या विषयांवरील लक्ष उठवून फक्त चर्चेत रहायचे, असा प्रकार चालवला आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय असा आहे.

आज महागाई इतकी तुफान वाढत आहे. सर्वसामान्य जनता पोळून निघत आहे. त्यावर सरकार काही करत नाही. नवाब मलिक या महागाईबाबत काही बोलत नाहीत. बेरोजगारी वाढत आहे. रोजगाराच्या संधी नाहीत. त्याबाबत नवाब मलिक आणि त्यांचे नेते गप्प राहतात; पण ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकलेल्यांना सोडवण्यासाठी जीवाचे रान करतात. कोणत्याही थराला जातात. आरोप केल्यामुळे विरोधकांना त्यावर भाष्य करणे भाग पडते. हे चालवलेले राजकारण अत्यंत गलिच्छ आहे. यामुळे ना नवाब मलिकांची प्रतिमा उजळ होणार आहे, ना फडणवीसांची प्रतिमा मलीन होणार आहे. केवळ आपल्या जावयाला वाचवण्यासाठी सामान्य जनतेला वेठीला धरण्याचे काम नवाब मलिक करत आहेत, म्हणजे भूल दिल्याशिवाय आॅपरेशन करता येत नाही आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही, हे तत्व सांभाळत फक्त दिशाभूल करण्याचे काम आज नवाब मलिक करत आहेत; पण त्यांच्या या कामाचा ना राष्ट्रवादीला फायदा होणार आहे, ना महाविकास आघाडीला काही त्याचा फायदा होणार आहे. फक्त आरोप करून स्वत:ची निष्क्रीयता झाकण्याचा प्रकार ते करत आहेत, हे जनतेपुढे जात आहे, हे नक्की.
आपण सरकारमध्ये आहोत, मंत्री आहोत. यापूर्वीही मंत्री होतो, हे सगळे भान विसरून जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी हे प्रकार चालले आहेत. आज अनेकांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. शाळ-महाविद्यालयांचे प्रश्न सुटलेले नाहीत. कोरोनाचे संकट अजून पुरते संपलेले नाही. पुढची लाट येणारच नाही, हे कोणी ठामपणे सांगत नाही. अशा परिस्थितीत नेमके जनतेला जे हवे आहे ते देण्याचा प्रयत्न केला जात नाही आणि फक्त आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू केलेले आहे. ही जनतेची होत असलेली दिशाभूल राजकारण्यांना महागात पडल्याशिवाय राहणार नाही.

स्वत:चे चारित्र्य स्वच्छ नाही, म्हणून दुसºयाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे. नेत्यांच्या कुटुंबीयांवर, त्यांच्या महिलांवर गलिच्छ आरोप लावायचे. तपास करणाºया अधिकाºयांना बदनाम करायचे, असले प्रकार करून काही साध्य होणार आहे का?, याचा तरी विचार करायला पाहिजे होता. समीर वानखेडेंच्या नावाने खडे फोडून झाले. त्यांना बदनाम करून झाले. खंडणी घेतल्याचा आरोप केला गेला. त्यांच्याकडून तपास काढून घेतला; पण तो दुसºया अधिकाºयांकडे गेला आहे. ते तपास करायला लागल्यावर त्यांनाही असेच बदनाम केले जाणार. खंडणीच्या आरोपाखाली वानखेडेंना तुरुंगात बसवणार आणि तशी गत पुढच्यांची करणार, असे भासवून ड्रग्ज प्रकरणांचा तपास थांबवायचे प्रयत्न सुरू केले आहेत का, अशी शंका आज प्रत्येकाच्या मनात आहे; पण नवाब मलिक आणि त्यांच्या नेत्यांनी जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे.
आज राज्यात एसटीचा संप चिघळलेला आहे. सर्वसामान्य माणसांना एसटीशिवाय पर्याय नसतो. खासगी वाहनचालकांकडून तुफान लुटमार सुरू आहे. अशावेळी चटके बसत असलेल्या जनतेबद्दल नवाब मलिक आणि त्यांच्या नेत्यांना काहीही वाटत नाही. त्यावर भाष्य करत नाहीत. फक्त जावई माझा भला या नाटकाचा प्रयोग करायचा आणि त्याची सुटका होईपर्यंत समोर येईल तो भ्रष्टाचारी, असे हत्यार वापरायचा जो प्रकार चाललेला आहे तो अत्यंत हिडीस आहे.

राज्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. खराब रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. काही रस्ते नेमके कोणाचे यावरून राजकारण सुरू आहे. या वादात जनतेला सुखसोयी मिळत नसताना, त्याकडे या नेत्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होते आहे. किंबहुना सामान्य जनतेने आपली गाºहाणी सरकारपुढे गाऊ नयेत, म्हणूनच जनतेची दिशाभूल करण्यासाठी हे आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण चालवले आहे काय?, असा प्रश्न पडतो.
राज्यात आगीच्या दुर्घटना घडत आहेत. सातत्याने हे प्रकार होत आहेत. नगरमध्येही अशीच आग मागच्या आठवड्यात लागली. त्यात डझनभर निष्पाप लोकांचे बळी गेले. त्याबाबत नवाब मलिकांना काही वाटत नाही. राज्यातील सगळीच रुग्णालये सुरक्षित आहेत का, याची चौकशी केली पाहिजे. प्रत्येक रुग्णालयात अग्निशमन व्यवस्था चोख आहे का, हे पाहण्याचे आदेश काढावेत, तशी कार्यवाही सुरू व्हावी यासाठी नवाब मलिक पुढाकार घेत नाहीत. सामान्य माणसं मेली काय, जगली काय आम्हाला त्याच्याशी काही पडलेले नाही, माझा जावई निर्दोष सुटला पाहिजे. म्हणून संपूर्ण राज्यालाच आणि राज्यातील जनतेलाच भंगारात काढायचे प्रयत्न चालवले आहेत, ते अत्यंत वाईट म्हणावे लागतील.

जनतेचे सगळे प्रश्न सुटले आहेत, सगळीकडे सुजलाम सुफलाम आहे. आता काहीतरी टाईमपास केला पाहिजे. जनतेचे मनोरंजन केले पाहिजे, त्यासाठी आता निवांत असलेल्या जनतेला सुखावण्यासाठी आपण आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू करत आहोत, असाच भ्रम मलिकांना झाला असावा; पण जे प्रकार सध्या चालवले आहेत, ते जनतेची दिशाभूल करणारे आहेत. हे प्रकार पाहून जनतेला आश्चर्य वाटत नाही की, धक्का बसत नाही. हे प्रकार नेमके कशासाठी चालले आहेत, हे जनता समजून घेत आहे, हे नक्की.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …