ठळक बातम्या

मुंबई महापौरांना धमकी : शरद पवार म्हणतात, …तर कुणी नादाला लागणार नाही

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज १२ डिसेंबर रोजी वाढदिवस असून, त्याच्या एक दिवस आधी पवारांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त लेखक, पत्रकार सुधीर भोंगळे यांच्या ‘नेमकचि बोलणे’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. शरद पवारांच्या गाजलेल्या भाषणांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे. यावेळी पवारांना अनेकांनी प्रश्न विचारले, ज्यावर पवारांनी आपल्या नेहमीच्या अंदाजात उत्तरे दिली. त्यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना आलेल्या धमकीच्या पत्रावरही एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. असे प्रकार झाल्यावर बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, त्यावर रिॲक्ट व्हावे लागेल. सर्व मुलींनी एकत्र येऊन रिॲक्ट करण्याची भूमिका घेतली, तर कुणी नादाला लागणार नाही.

मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी शरद पवारांना अनेक मान्यवरांनी आपल्या मनातील प्रश्न विचारले. सामाजिक कार्यात काम करत असताना महिलांना धमक्या दिल्या जात आहेत. अश्लील भाषेचा वापर केला जातो. याबाबत तुम्हाला काय वाटते?, असा प्रश्न केला असता, पवार म्हणाले की, अशी उदाहरणे ऐकायला मिळतात. ज्यांना याच्या यातना भोगाव्या लागतात. त्यांनी बघ्याची भूमिका घेऊ नये. त्याच्या संदर्भात आपली भूमिका तातडीने घ्यायला हवी. आता नुकतेच मुंबईच्या महापौरांना कुणीतरी अश्लील भाषेत पत्र लिहून धमकी दिली. त्यानंतर मुंबईच्या महापौरांनी तात्काळ यासंदर्भात तक्रार दाखल केली आणि आपले म्हणणे मांडले. यानंतर महापौरांना यातना देणाऱ्यांच्या विरोधात जनमाणसातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. तर इतर जण याबाबत खुलासा करत आहेत की, आम्ही यात नाहीत. असे प्रकार होतात, ते प्रकार झाल्यावर बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, त्यावर रिॲक्ट व्हावे लागेल. सर्व मुलींनी एकत्र येऊन रिॲक्ट करण्याची भूमिका घेतली तर कुणी नादाला लागणार नाही. दरम्यान, अर्थशास्त्रज्ञ, पत्रकार सुधीर भोंगळे यांनी शरद पवारांच्या भाषणांचा संग्रह असलेले ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत, रंगनाथ पठारे, कवी किशोर कदम, सुधीर भोंगळे उपस्थित होते. तर डॉ. विजय केळकर ऑनलाइन उपस्थित होते, तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्याचे मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे आदी सभागृहात उपस्थित होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …