मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे सर्वत्र किमान तापमानात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी मुंबईत यंदा थंडीच्या हंगामातील सर्वात कमी १३.२ अंश तापमानची नोंद करण्यात आली आहे. उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट आणि वारंवार होणारी बर्फवृष्टी मुंबईतील थंडीला कारणीभूत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
स्कायमेट या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रुझ परिसरात १३.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईतील पारा ५ अंशांनी घसरला आहे. मुंबईत ही स्थिती पुढील ३ ते ४ दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, दिवसभर थंडी असल्याने अनेक मुंबईकर सोबत स्वेटर, कानटोपी घेऊनच निघाल्याचे दिसत होते. त्यामुळे मुंबईकर खऱ्या अर्थाने गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत.