मोर्चा, रॅली, तसेच आंदोलनावर बंदी
मुंबई – कोविड संक्रमणाचा धोका वाढल्याने मुंबईत आता नव्याने जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन पसरत असल्याने काळजी म्हणून रॅली, आंदोलन आणि सभांना परवानगी नसल्याचे मुंबई पोलिसांकडून काढण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी १४४चे कलम लागू करताना नवे आदेश जारी केले आहेत. मुंबईत रात्रीपासून १२ डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मोर्चा, रॅली किंवा कोणत्याही आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही.
एमआयएमकडून काही कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार होते, त्या निमित्ताने मुंबई पोलिसांनी आदेश काढल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात अमरावती, नांदेडमध्ये झालेल्या हिंसाचाराचाही संदर्भ देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केल्यानंतर वाहनांची कसून तपासणी सुरू केली आहे, तसेच ठिकठिकाणी नाकाबंदीही केली आहे.