मुंबईतील विविध विकास प्रकल्पांच्या कामांचा आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

मुंबई – मुंबईच्या विकासासाठी सुरू असलेले विविध पायाभूत सुविधा प्रकल्प दर्जेदार आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावेत, या अनुषंगाने पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे या प्रकल्पांचा नियमित आढावा घेतात. बुधवारी त्यांनी दहिसर चेक नाका परिसरातील वाहतूक कोंडी सोडविणे, वरळी-शिवडी जोडरस्ता तसेच माहिम किल्ला परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास या कामांचा सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला.

पश्चिम एक्स्प्रेस हायवेवर मुंबईतील प्रवेशद्वार असलेल्या दहिसर चेक नाका परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता करावयाच्या उपाययोजनांसाठी आदित्य ठाकरे सातत्याने प्रयत्नशील आहेत. बुधवारी त्यांनी एमएमआरडीए आणि वाहतूक पोलिसांसमवेत या कामांचा आढावा घेतला. येथे बहुतांश उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. मेट्रो ९ पियर आणि रिसरफेसिंगचे काम पुढील काही दिवसांमध्ये पूर्ण झाल्यानंतर निश्चितच येथील वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच वरळी-शिवडी जोडरस्त्याच्या कामाच्या अनुषंगाने स्थानिक आमदार आणि नगरसेवकांनी नागरिक आणि प्रकल्पबाधितांच्या उपस्थित केलेल्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी संबंधितांना सूचना केल्या. हा प्रकल्प मध्य मुंबईतील वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचा असून, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोडसोबतच पूर्ण होणे गरजेचे असल्याने कामं गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले. माहिम रेतीबंदर परिसराचा पर्यटनदृष्ट्या कायापालट करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे माहिम किल्ल्याचाही विकास करण्यात येणार आहे. या अनुषंगानेही बुधवारी चर्चा केली. या बैठकांच्या वेळी आमदार सदा सरवणकर, अजय चौधरी, नगरसेवक श्रद्धा जाधव, उर्मिला पांचाळ, समाधान सरवणकर, एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, अपर पोलीस आयुक्त (वाहतूक) सत्यनारायण, स्थानिक लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …