मुंबईतील अविघ्न टॉवर इमारतीत अग्नितांडव

जीव वाचवताना खाली पडून रहिवाशाचा मृत्यू
मुंबई – मुंबईतील करी रोड आणि लोअर परेल रेल्व स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर अविघ्न पार्क या रहिवासी इमारतीला शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या साठमजली इमारतीच्या १९ व्या मजल्यावर आग लागली होती़ सुमारे दोन ते अडीच तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले़ आग चार नंबरची घोषित करण्यात आली. यादरम्यान एक दुर्दैवी घटला घडली़ आगीतून जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारा एक रहिवासी बाहेर लटकत होता, मात्र यावेळी उंचावरुन खाली पडल्याने तो मृत्युमुखी पडला. अरुण तिवारी असे या दुर्दैवी घटनेत मरणपावलेल्या रहिवास्याचे नाव आहे़ या सगळ्या घटनाक्रमादरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इकबाल चहल हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते़ परिस्थितीची पाहणी केल्यानंतर चहल यांनी एक चिंताही व्यक्त केली आहे.

करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. १९ व्या मजल्यावर आग लागल्यानंतर विसाव्या मजल्यापर्यंत पसरली. आग लागल्यानंतर दुरुन आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता. इमारतीला आग लागल्यानंतर इमारतीतील रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. आग १९ व्या मजल्यावर लागल्याने धूर वरती पसरत खाली येत होता. शिवाय संपूर्ण इमारतीतील मजले रहिवाशांनी भरलेले नव्हते. त्यामुळे इमारतीच्या इतर विंगमधील रहिवाशांनी बाहेर पडण्यासाठी धावपळ केली. रहिवास्यांनी धावपळ करत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला़ अग्निशमन दलाने युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेऊन उर्वरित सर्व रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन दलाने युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेऊन आग संपूर्ण इमारतीत पसरू दिली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाला इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढता आले. याच दरम्यान १९ व्या मजल्यावर एकजण आडकला होता़ तो जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना तो इमारतीच्या बाल्कनीत गेला. मात्र जीव वाचवण्यासाठी काळ्या कुट्ट धुरातून मार्ग काढत तिवारी इमारतीच्या सज्जावर जाऊन लटकून राहिला, मात्र हात सुटून तो थेट खाली कोसळला़ दुर्दैवाने जमिनीवर पडून त्यांचा मृत्यू झाला़

तर एक जीव वाचला असता – महापौर
उंच इमारतीच्या आगीच्या संदर्भात घटना वाढत आहेत. यावर महापालिका प्रशासन निश्चित धोरण तयार करणार आहे. उंच इमारती होतात तेव्हा फायर सेफ्टी महत्त्वाची आहे. स्प्रिंग आणि हायड्रोलिक वॉटर सिस्टीम तिथं कार्यरत होती हे प्रत्यक्षात जाणवले आहे. अग्निशमन दलाचे जवान शिडी लावून चढेपर्यंत अरुण तिवारी याचा हात निसटला आणि तो खाली पडला. सोसायटीच्या सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान दाखवलं असते तर एक जीव वाचला असता, अशी खंत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे.

दोषींवर कारवाई होणार – आयुक्त चहल

अविघ्न इमारतीच्या १९ व्या आणि २० व्या मजल्यावर आग जास्त पसरली. काहीच मिनिटांमध्ये महापालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले. आग विझवण्यावर आणि रहिवाशांच्या सुटकेवर जास्तीत जास्त भर दिला. याप्रकरणी जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करु. माहिती मिळाली आणि लगेचच तिथे लोक पोहोचले. आमचे अधिकारी त्या इमारतीतच आहेत. दोन वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या या इमारतीत अग्निसुरक्षा यंत्रणेचे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चौकशी करून कारवाई केली जाईल़ दुर्घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करु, अशी माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *