मिरज वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना: अहवाल सादर करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्याचे आदेश

सांगली – सांगली जिल्ह्यातील मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील ८२ शिकाऊ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मिरज वैद्यकीय महाविद्यालय कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. या प्रकरणची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. या निष्काळजीपणाबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करावा अशा सूचना महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना देशमुख यांनी दिल्या आहेत. याबाबतचा अहवाल प्राप्त होताच यास जबाबदार असर्णा­यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.
वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर, डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल तसेच अन्य कर्मचारी वैद्यकीय सेवा पुरवितात. या मंडळींनाच कोरोनाची लागण झाली तर वैद्यकीय सेवा कशी पुरविणार असा प्रश्न अमित देशमुख यांनी उपस्थित केला आहे. या शिकाऊ डॉक्टरांना कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होण्यासाठी कोणत्या बाबी कारणीभूत आहेत याबाबत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांच्याकडे विचारणा केली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या सर्वच रुग्णांचे स्वॅब ओमायक्रॉन तपासणीसाठी पुणे आणि दिल्लीतील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. दरम्यान या रिपोर्टकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ही घटना लक्षात घेता राज्यातील अन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनीही याबाबतचे नियम काटेकोरपणे पाळावेत. कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले मनुष्यबळ बाधित होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व महाविद्यालयांना सतर्क करण्यात यावे याबाबतच्या सूचनाही मंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिल्या आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …