मुंबई – गेल्या दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करत आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना, दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकास कामे सुरूच राहावीत, म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करत आहोत. मानदेखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हटले, तरी थोडेसे दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावरील शारीरिक त्रासाबद्दल सांगितले आहे. दरम्यान, मानेच्या दुखण्यावर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे बुधवारी रुग्णालयात दाखल झाले. त्याआधी त्यांनी एका परिपत्रकाद्वारे जनतेशी संवाद साधला. ज्यात ते म्हणाले की, मानेच्या या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीने डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज (बुधवारी) रुग्णालयात दाखल होणार असून, दोन ते तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठिशी आहेत, त्यामुळं लवकरच तब्येत बरी होईल, अशी खात्री आहे.