ठळक बातम्या

माझे स्विस बँकेतील खाते

 

बँकेत ठेवायला पैसे लागतात, ही केवळ एक ऐकीव बातमी होती किंवा अफवा आहे. हे आता आम्हाला कळून चुकले आहे. अगदी खिशात दमडी नसली, तरी झिरो बॅलेन्स खाते उघडणे शक्य झाले आहे. कुठल्याही बँकेच्या बाहेर तुमच्या स्वागताचे बोर्ड झळकलेले असतात. तुमच्या सर्वसाधारण नजरेस एरवी दृष्टीस न पडणारं, असं अत्यंत समाधानी हसतमुख कुटुंब, एखादे नवीन घर घेतल्याचा आनंद सहकुटुंब साजरा करत असते. नव्या घेतलेल्या चारचाकी गाडीची पूजा करत असते. त्या चित्रातील कुटुंब म्हणजे नुसते आनंदाने ओतप्रोत भरलेले. आजी आजोबा, आई-बाबा, मुलगा-मुलगी, त्यांचे कपडे, चेहरे, केस, दात सगळेच कसे अगदी हास्याचा मळाच फुलावा असे. बाहेर असा बोर्ड लावलेल्या बँकेत तुम्ही जायची खोटी, थंडगार एसीचे वातावरण, बसायला गुबगुबीत कोच, पाण्याचे ग्लास भरून ठेवलेले आणि एका टेबलावर ‘ग्राहक मित्र’, म्हणून पाटी लटकत असते. तेथे खाली मात्र बरेच वेळा कोणीच नसते, तुम्हाला प्रश्न पडतो हा मित्र गेला कुठे? तो तुमच्या सारखाच इतरांचाही मित्र असल्यामुळे त्याला सर्वत्र फिरावे लागते. अशा मैत्री पूर्ण वातावरणात, तुम्ही तुमचे झिरो बॅलेन्स खाते उघडू शकता.
स्विस बँकेत अशी काही सोय आहे का? कल्पना नाही, कारण त्या बँकेत देखील, शून्य बॅलेन्सने खाते उघडता यायला हवे. नंतर काळ वेळ पाहून हवे तेवढे पैसे भरण्याची मुभा असावी. मनी असे ते स्वप्नी दिसे, असं म्हणतात. त्याचा मला लगेच प्रत्यय त्या दिवशी म्हणजे रात्री आला.

मला त्या दिवशी एक मजेशीर स्वप्न पडले, आमच्या गल्लीत, स्विस बँकेची एक शाखा उघडली असून, त्यात शून्य बॅलेन्सवर माझे खाते उघडले आहे आणि त्यांच्या एटीएममशीनमधून कार्ड टाकायचा अवकाश, मला हव्या तेवढ्या नोटा भरभर बाहेर पडल्या; पण नीट निरखून पहिले तेव्हा कळले, त्या नोटांचा रंग काळा होता; पण मी मनाची स्वप्नातच समजूत काढली, हा बहुतेक वेगळा रंग मुद्दामच दिला असावा. त्या नोटा खिशात टाकून सरळ वाण्याच्या दुकानात गेलो. मला वाटलं वाणी त्या काळ्या नोटा, ब्लॅक मनी म्हणून स्वीकारण नाही; पण गंमत म्हणजे, त्यांनी त्या सर्व नोटा आनंदाने नुसत्या स्वीकारल्याच नाहीत, तर गपचुप आपल्या शर्टाच्या आत घातलेल्या बंडीच्या खिशात घातल्या आणि गल्ल्यातल्या नव्या नोटा त्याही दुप्पट माझ्या हातात ठेवल्या. मला म्हणाला, येत जा असे रोजरोज; पण दुसºया दुकानात जाऊ नका. आज दुप्पट दिलेत, अजूनही ज्यास्त देईन. माझ्या हातात एक एक्लेरचे दोन रुपयेवाले चॉकलेट ठेऊन म्हणाला जय रामजीकी.
मी स्वप्नातच उड्या मारत मारत परत एटीएमकडे धावलो आणि एटीएमच्या दरवाजात पाय घसरून पडलो आणि झोपेतून खडबडून जागा झालो. मी कॉट वरून जमिनीवर आलो होतो. बायको धावत बाहेर आली, मी काही लागलं नाही याचा अभिनय करत करत खिसे चाचपू लागलो. काल बायकोने भरायला सांगितलेलं वाण्याचं बिल खिशात होतं. खाली अगम्य मराठीत त्यांनी लिहिले होते, तीन महिने का बिल बाकी हाय, उधारी बंद.

म्हणजे स्विस बँक माझ्या फक्त स्वप्नातच होती. थोडक्यात काय माझ्या सारख्याच्या नशिबी, स्विस बँकेतला पैसा केवळ स्वप्नातच आणि कल्पना विलासाचा भाग म्हणूनच राहणार; पण मी मनाची समजूत काढली, स्वप्नात का होईना माझे स्विस बँकेत खाते होते.
– मोहन गद्रे \\

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …