मुंबई – रियाझ भाटीचे सचिन वाझे प्रकरणात नाव आहे, तेव्हापासून तो गायब आहे. आपले बिंग फुटू नये म्हणून राष्ट्रवादीने तर त्याला गायब केले नाही ना? असा आमचा संशय आहे, असा खळबळजनक दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. तसेच रियाज भाटी यांचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंतचे फोटो दाखवून शेलार यांनी एकच खळबळ उडवून दिली.
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन रियाझ भाटीबाबतचे नवे खुलासे केले. पंतप्रधान कार्यालय किंवा पंतप्रधानांच्या कार्यक्रमाशी रियाझ भाटीचा काहीही संबंध नाही. फोटोवरूनच संबंध प्रस्थापित करायचे असतील, तर त्याच्यासोबत अनेकांचे फोटो आहेत, असं शेलार म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबतचे फोटो दाखवून खळबळ उडवून दिली. फोटो दाखवून कुणालाही बदनाम करण्याचा धंदा करू नका. तुम्ही एक बोट दाखवाल, तर तुमच्याकडे चार बोटं येतील, असा इशाराच त्यांनी दिला. तसेच रियाझ भाटी गायब असल्याचे सांगितले जाते. तो गायब आहे की, त्याला पळवले गेले. रियाझ भाटीला पळवून नेण्याचे काम, तर राष्ट्रवादीने केलं नाही ना, हा आमचा आरोप आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे क्रिकेटच्या राजकारणात रियाझला राजाश्रय कुणी दिलं?, असा सवाल करतानाच पण आम्ही कोणत्याही बड्या नेत्याचं नाव घेऊन सेन्सेशन करणार नाही. ती आमची प्रथा, परंपरा नाही. आम्ही ते करणार नाही, असेही शेलार म्हणाले.