* स्वच्छ शहरांत नवी मुंबई चौथ्या, पुणे आठव्या स्थानी
* स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राला एकूण ९२ पुरस्कार
नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात मध्य प्रदेशातील इंदूरने सलग पाचव्या वर्षी स्वच्छ शहराचा किताब पटकावला आहे, तर स्वच्छ राज्यांच्या श्रेणीत छत्तीसगड अव्वल स्थानी कायम असून, महाराष्ट्राने दुसऱ्या व मध्य प्रदेशने तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईने चौथे, तर पुणे शहराने आठवे स्थान पटकावले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विजेत्या शहरांना पुरस्कार प्रदान करत स्वच्छ भारत मिशनमुळे लोकांच्या विचारसरणीत मोठा सकारात्मक बदल घडून आल्याचे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी डोक्यावरून मैला वाहण्याच्या जुन्या प्रथेवर प्रहार करत सर्व शहरांमध्ये मशीनद्वारे स्वच्छता करण्याचे आवाहन केले.
केंद्र सरकारकडून ‘वार्षिक स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२१’ च्या विजेत्यांची शनिवारी घोषणा करण्यात आली. देशपातळीवरील या स्वच्छता सर्वेक्षणात २८ दिवसांत ४,३२० शहरांमधील तब्बल ४.२ कोटी लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. टॉप १० स्वच्छ शहरांमध्ये गतवर्षी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नवी मुंबईच्या क्रमवारीत एका अंकाची घसरण झाली आहे. नवी मुंबईने चौथे तर पुणे शहराने आठवे स्थान पटकावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीला ‘स्वच्छ गंगा शहर’ श्रेणीत पहिले स्थान मिळाले. छत्तीसगड देशातील सर्वात स्वच्छ राज्य ठरले आहे. या श्रेणीत महाराष्ट्राने दुसरा, तर मध्य प्रदेशने तिसरा क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुरस्काराचे वितरण करत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वच्छतेसंबंधीचे विचार मांडले. गांधींचा स्वच्छतेला सर्वोच्च प्राथमिकता देण्याचा विचार केंद्रस्थान ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मोहिमेला जनआंदोलनाचे स्वरूप दिले असल्याचे ते म्हणाले.
एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या स्वच्छ शहरांमध्ये महाराष्ट्रातील विटा शहराने बाजी मारली आहे. यापाठोपाठ लोणावळा आणि सासवड शहरांचा क्रमांक लागतो. ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या श्रेणीत नोएडा देशात ‘स्वच्छ मध्यम शहर’ म्हणून समोर आले आहे. तर नवी मुंबईने ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज’ पटकावले आहे. शिवाय १० ते ४० लाख लोकसंख्येच्या श्रेणीत देशातील सर्वात मोठे स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबईने पहिल्या स्थानावर बाजी मारली आहे.