कुस्तीगीर परिषदेकडून जय्यत तयारी
कोल्हापूर – राज्यभरातील मल्लांना महाराष्ट्र केसरी स्पर्धेची प्रतीक्षा लागली आहे. २०२१ मध्ये होणारी ही स्पर्धा जानेवारी २०२२ मध्ये होण्याची शक्यता असून, त्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून तयारी सुरू आहे.
कोरोना संक्रमणामुळे कुस्ती मैदानांसह महाराष्ट्र केसरी स्पर्धेलाही पाठ टेकवावी लागली. कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर स्पर्धा आयोजनाची चर्चा सुरू झाली. नोव्हेंबरमध्ये स्पर्धा होतील या आशेने पैलवान तयारी करू लागले; मात्र अन्य महत्त्वाच्या कुस्ती स्पर्धा तसेच पुणे येथील बालेवाडी मैदानाची अनुपलब्धता यामुळे डिसेंबरचा पहिला आठवडा संपला तरी तारखांची घोषणा झाली नाही. दरम्यान, ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे स्पर्धेची तयारी करणाऱ्या मल्लांमध्ये स्पर्धेसंदर्भात साशंकता निर्माण झाली. यंदा जानेवारीमध्ये महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या स्पर्धा घेतल्या जाव्यात यासाठी कुस्तीगीर परिषदेतर्फे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शासकीय पातळीवर आवश्यक परवाने घेतले जात आहेत.
विनाप्रेक्षक कुस्ती चाचपणी...
महाराष्ट्र केसरी स्पर्धा जानेवारी महिन्यामध्ये आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रभाव वाढल्यास विनाप्रेक्षक कुस्ती स्पर्धा घेण्याचा पर्यायही आयोजकांसमोर आहे. त्यादृष्टीनेही चाचपणी सुरू करण्यात येत आहे. -अमृत भोसले, उपाध्यक्ष, जिल्हा तालीम संघ