ठळक बातम्या

महाराष्ट्रासह १४ राज्यांमध्ये पोटनिवडणुकीसाठी शांततेत मतदान

दादरा-नगर-हवेलीमध्ये थेट शिवसेना-भाजप लढत
तर नांदेडमध्ये तिरंगी लढत
नवी दिल्ली – देशात शनिवारी एकूण ३ लोकसभा आणि ३० विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकींचे मतदान शांततेत पार पडले. बहुतेक राज्यांमध्ये सरासरी ६० टक्के मतदानाची नोंद झाली असून, हरियाणात सर्वाधिक ७३ टक्के मतदान झाले आहे. पोटनिवडणूक असल्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला. त्यामुळे या पोटनिवडणुकींचा निकालही रंगतदार असणार आहे; मात्र या निकालाकरिता २ नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
देशातील ३० विधानसभा जागांमध्ये १४ राज्यांच्या मतदारसंघांचा समावेश होता. यात सर्वाधिक ५ जागा आसामच्या, ४ पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयातील प्रत्येकी ३, बिहार, कर्नाटक, राजस्थानमधील प्रत्येकी २ आणि महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, हरियाणा, मिझोराम, नागालँडमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे, तर ३ लोकसभेच्या जागांसाठीही पोटनिवडणूक झाली. यात दादरा-नगर-हवेली, हिमाचल प्रदेशमधील मंडी आणि मध्य प्रदेशमधील खंडवा लोकसभा मतदारसंघांचा समावेश होता.

देगलूर पोटनिवडणुकीत तिरंगी लढत
देगलूर – विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्त राज्यातील दिग्गज नेत्यांनी सभा, बैठकांचा धुराळा उडवला. खऱ्या अर्थानं ही निवडणूक उमेदवाराच्या चेहऱ्यावर झाली नाही. कमळ आणि पंजाच्या चिन्हावर लढली गेली. अगोदर कमजोर पडलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने ॲड. बाळासाहेब आंबेडकरांची सभा झाली आणि मतदारसंघाचं राजकीय चित्र बदलले.

कोरोनामुळे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक झाली. काँग्रेसकडून रावसाहेबांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर, आयत्यावेळी शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले सुभाष साबणे भाजपच्या तिकिटावर, तर वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. उत्तम इंगोले या प्रमुखांसह १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, काँग्रेस, भाजपने राज्यातले एक आणि दोन क्रमांकाचे सर्वच नेते देगलूरमध्ये प्रचारासाठी आणले. देगलूरच्या इतिहासात न भुतो न भविष्यती एवढे नेते या मतदारसंघात येऊन गेले. आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत स्थानिक मुद्दे बाजूला राहिले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या देगलूर मतदारसंघात त्यांनी जातीने लक्ष घातले, तर भाजपने राज्यातील प्रचार यंत्रणेची ताकद लावून पंढरपूरची पुनरावृत्ती करू, असे म्हटले आहे.
दादर-नगर-हवेलीमध्ये थेट शिवसेना-भाजप लढत
दादरा-नगर-हवेली मतदारसंघाचे ७ वेळा खासदार राहिलेले मोहन डेलकर मुंबईतील एका हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आहे. डेलकर हे २०१९ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढले आणि खासदार म्हणून निवडून आले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी कलाबेन डेलकर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्या शिवसेनेच्या वतीने उमेदवार आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपने आपला उमेदवार उतरवला आहे. शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढवली आहे. डेलकर यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांपासून सर्व नेतेमंडळी दादरा-नगरमध्ये ठाण मांडून होते. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …